नऊ डिसेंबरच्या मॅरेथॉनची नऊ वैशिष्ट्ये

नऊ डिसेंबरच्या मॅरेथॉनची नऊ वैशिष्ट्ये

पुणे - येत्या नऊ डिसेंबर रोजी होणारी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन पुणेकरांसाठी आरोग्याचा जागर करेल. तंदुरुस्तीसाठी धावण्याची प्रेरणा त्यातून मिळेल. ‘सकाळ’ माध्यम समूहाने या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून पुढाकार घेतला असून, नऊ डिसेंबर हा पुणे हेल्थ डे म्हणून साजरा करावा अशी साद दिली आहे. आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग असलेल्या मॅरेथॉनमधील फॅमिली रनला प्रतिसाद मिळत आहे. धावण्याचे पद्धतशीर ट्रेनिंग दिले जात आहे. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी काय करावे, असा ऊहापोह होण्याऐवजी धावण्याविषयी नसावा वाद हाच प्रवाद निर्माण होत आहे.

धावण्याच्या शास्त्राचे जनक मेंटॉर 
धावण्याच्या शास्त्राचे जनक तसेच अनेक ऑलिंपियन घडविलेले अमेरिकी प्रशिक्षक डॉ. जॅक डॅनिएल्स मेंटॉर, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्मार्ट रनिंगचा १० व २१ किमी शर्यतीमधील स्पर्धकांना फायदा. नव्याने सुरवात करणाऱ्यांना धावण्याची योग्य पद्धत कोणती याचे मार्गदर्शन, आधी धावणाऱ्यांना कामगिरी उंचावण्यासाठी कानमंत्र, नियमित धावणाऱ्यांना वेळेत सुधारणा व्हावी म्हणून आणखी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण.

अमेरिकी ऑलिंपियन ब्रॅंड अँबेसिडर
हाफ मॅरेथॉनसाठी एका तासापेक्षा कमी वेळ नोंदविलेला अमेरिकी धावपटू रायन हॉल हा ब्रॅंड अँबेसिडर आहे. तो अमेरिकेतच नव्हे तर भारतात नियमित धावणाऱ्यांमध्येही कमालीचा लोकप्रिय आहे. त्याच्या पुणे-मुंबईतील भेटीत प्रोमो रनमध्ये त्याच्या साथीत धावण्यासाठी नियमित तसेच हौशी धावपटूंचा जोरदार प्रतिसाद.

फॅमिली रनची संकल्पना मोलाची
अनेक कुटुंबांत प्रामुख्याने केवळ पुरुष धावतो किंवा व्यायामासाठी बाहेर पडतो. गृहिणी घरातच योगा करतात, तर मुले खेळतात किंवा खेळत नाहीत असे चित्र दिसते. यामुळे पार्टी-पिकनिक सहकुटुंब-सहपरिवार करणाऱ्यांना तंदुरुस्तीसाठी एकत्र येण्याची संधी. यासाठी सहा किलोमीटरचा खास गट, ज्याचे रायन हॉल, डॉ. जॅक यांच्याकडूनही स्वागत.

पुणे हेल्थ डेचे आयोजन
नागरीकरणाकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या पुण्याला स्मार्ट सिटीचा लौकिक सार्थ ठरविण्यासाठी स्मार्ट रनिंगची गरज असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत. त्यासाठी केवळ मॅरेथॉन आणि काही गटांच्या शर्यती न घेता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये तंदुरुस्तीविषयी जनजागृती आणि सक्रिय सहभाग व्हावा म्हणून पुणे हेल्थ डेची ‘सकाळ माध्यम समूहा’कडून साद.

प्रथमच पोलिस कमिशनर कप
पोलिसांचे आरोग्य, त्यांच्यावरील कामाचा ताण, त्यांची जीवनशैली आदींविषयी चर्चा नेहमीच होते. मुख्य म्हणजे पोलिसांना चांगल्या कामगिरीचे श्रेय जनतेकडून क्वचितच मिळते. अशावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी केवळ सहभागच नव्हे, तर अनोख्या पद्धतीने धावण्याची संधी, चार जणांचा एक संघ अशी प्रवेशिका, चौघांच्या वेळेची सरासरी विजेता ठरविणार. सांघिकप्रमाणेच वैयक्तिक गटातही पोलिस बक्षीसास पात्र ठरणार. राज्यातील कोणताही पोलिस कर्मचारी भाग घेऊ शकणार.

शाळांचा पुढाकार
मुलांवरील दप्तर, होमवर्क, शाळेतील अभ्यास आदींचा ताण, फास्टफूडमुळे त्यांच्या आरोग्याचा ढासळता पाया, आदी समस्यांची चर्चा नेहमीच होते. अशावेळी शालेय मुला-मुलींनी पुढाकार घ्यावा म्हणून विशेष प्रयत्न केले जात असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध भागांतील खासगी-सरकारी शाळांमधून मुले-मुली अक्षरशः शेकड्याने भाग घेत आहेत.

विद्यापीठाचीही साद
विद्यापीठ स्पर्धा हा वरिष्ठ पातळीवरील क्रीडापटूंच्या कारकिर्दीची पहिली पायरी असते. आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये चैतन्य निर्माण व्हावे म्हणून वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. शाळेच्या तुलनेत विद्यापीठातील विद्यार्थ्यांचीही वेगळी अवस्था नसते. अशावेळी मॅरेथॉनच्या निमित्ताने या पातळीवरील खेळाडूंना सहभागाची, तर सामान्य विद्यार्थ्यांना तंदुरुस्ती आजमावण्याची सुवर्णसंधी.

मोफत ट्रेनिंगची संधी
शहरातील पाच मध्यवर्ती ठिकाणी कुशल ट्रेनर सकाळी मोफत मार्गदर्शन करीत आहेत. त्यासाठी संयोजकांनी विचारपूर्वक कार्यक्रम आखला आहे. या ठिकाणी दिले जाणारे ट्रेनिंग कुतुहलाचा विषय ठरले आहे. त्यामुळे हौशी नागरिक धावण्यास सुरवात करीत असल्याचे चित्र दिसते. याशिवाय ‘सकाळ’मधून दररोज प्रसिद्ध होणारे ट्रेनिंग टीप्स हे माहितीपूर्ण सदरही दीपस्तंभ ठरले आहे. 

स्वयंसेवी, सामाजिक संस्थांचा प्रतिसाद
लायन्स, लिओ, रोटरी अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ कार्यालयास भेट देऊन स्पर्धेची माहिती घेतली. त्यांच्याकडून पुणे हेल्थ डे संकल्पनेचे स्वागत झाले असून या संस्था मॅरेथॉनमध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी व्हावेत म्हणून पुढाकार घेत आहेत.

खो-खोसाठी धावणे अविभाज्य घटक आहे. यामुळे पायातील ताकद, वेग आणि स्टॅमिना वाढतोच. या खेळ मुळात धावण्यातूनच सुरू होतो. काही खो-खो खेळाडू तर वाळूत धावण्याचा सराव करतात, त्यामुळे मैदानावर त्यांचा वेग आणि स्टॅमिना जास्त असतो. तुम्ही खो-खो खेळत नसलात तरी धावणे हा चांगला व्यायाम प्रकार आहे. उत्तम प्रकृतीसाठी धावणे किंवा ज्यांना धावणे जमत नाही त्यांनी चालणे सर्वार्थाने उपयोगी आहे. मॅरेथॉनसाठी ही उत्तर पूर्वतयारी होऊ शकते.
- अरुण देशमुख, राज्य खो-खो संघटनेचे सचिव

धावण्यामुळे पायातील क्षमता वाढते, दमसासही भक्कम होतो आणि याचा फायदा कबड्डीत होतो. त्यामुळे कबड्डीपटूंसाठी धावणे महत्त्वाचे असते. ऑफसिझनमध्ये कबड्डीपटू धावणे, जॉगिंगने तंदुरुस्ती वाढवतात, त्यामुळे पदलालित्यही चपळ होत असते. निवृत्त खेळाडूही सकाळच्या रनिंगने फिट राहात असतात. स्पर्धेनिमित्त शहराबाहेर असलो तरी आम्ही वेळात वेळ काढून रनिंग करत असतो. ‘सकाळ’च्या अर्ध मॅरेथॉनला माझ्या शुभेच्छा!
- विश्‍वास मोरे, मुंबई कबड्डी संघटनेचे सचिव

प्रत्येक खेळाडूस तंदुरुस्त राहावेच लागते. माझ्या तिरंदाजीतील प्रत्यक्ष कामगिरीसाठी धावण्याचा थेट फायदा होत नसला, तरी त्याचा मला लक्ष्य साधताना आवश्‍यक असलेली अचूकता साधण्यासाठी उपयोग होतो. त्यासाठी मी रोज पाच कि.मी. रनिंग करते. हे आठवड्यातून पाच दिवस असते. त्याचा फायदा मला तिरंदाजीसाठीही होते. दीर्घ पल्ल्याचे धावल्याने हार्ट बिट्‌स कमी होतात. हे हार्ट बिटस्‌ ७२ वरून ६५पर्यंत कमी होतात. त्यामुळे लक्ष्य साधण्यास मदत होते. 
- दिव्या दयाल, विश्वकरंडक पदकविजेती तिरंदाज

बॅडमिंटन हा वेगवान खेळ आहे. मी दुहेरीत खेळत असल्याने याची जास्त आवश्‍यकता नसते. मात्र आम्हीही खेळाडूच आहोत. ॲथलेटिक्‍स ही सर्वच खेळांची जननी आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी, शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी नियमितपणे रनिंग करतो. स्पर्धा नसतानाही सराव सुरू असतो. त्या वेळी एक दिवसाआड अर्धा तास रनिंग करतो. स्पर्धेस जाण्याच्या आदल्या दिवशी आवर्जून रनिंग करतो. स्पर्धा कालावधीत मात्र त्यास ब्रेक असतो.  
- चिराग शेट्टी , आंतरराष्ट्रीय दुहेरी बॅडमिंटनपटू

कबड्डी आणि रनिंग हा काहीसा विरोधाभास वाटला, तरी आम्हाला सरावापूर्वी रनिंगचा फायदा होतो. मी स्वतः रोज सकाळी धावतो. धावताना सुरवात करताना सुरवातीस पाच ते दहा मिनिटे स्लो रनिंग करतो आणि त्यानंतर वेग वाढवतो. हे पाच किलोमीटरचे रनिंग झाल्यावर दोनशे मीटर स्प्रिंट करतो. कबड्डीत वेग आवश्‍यक असतो, तसेच वेगवान हालचालीही. या दोन्हीला या सरावाने मदत होते. त्याचबरोबर प्रत्यक्ष कबड्डीच्या सरावासाठी आपले शरीर तयार होते. 
- आमीर धुमाळ, विजेत्या रायगडचा कर्णधार

टेबल टेनिसमध्ये तुम्हाला धावणे दिसत नसले, तरी खडतर लढतींत तंदुरुस्तीसाठी रनिंगचा उपयोग नक्कीच होतो. हा माझा सराव तीस चाळीस मिनिटांचा असतो. त्यात स्लो आणि फास्ट रनिंग असते. स्पर्धा नसलेल्या दिवशी तो सरावाच्या पूर्वतयारीचा एक भागच झालेला आहे. प्रत्यक्ष स्पर्धा असताना स्पर्धा कार्यक्रमावर ते अवलंबून असते. एकाच दिवशी तीन लढती असल्यास त्यास ब्रेक असतो. पण एकच लढत असल्यास मात्र रनिंग आवर्जून करते.   
- मधुरिका पाटकर,  राष्ट्रकुल सुवर्णविजेती टेबल टेनिसपटू

शारीरीक तंदुरुस्तीबरोबरच चांगले, उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने धावण्याला प्राधान्य द्यावे. विशेषतः लहानपणापासूनच धावण्याची ही गोडी लागली, तर त्याचा भविष्यात खूप फायदा होतो. आरोग्यम धनसंपदा म्हणतात ते उगीचच नाही. एक ॲथलिट म्हणून दररोज पाच ते सहा तास सराव करताना मैदानावर वेळ निश्‍चित करून धावणे आणि कमीत कमी वेळेची नोंद ठेवणे, हे माझे ध्येय होते. धावणे हे एक लाभदायी आरोग्यासाठी टॉनिकच आहे, असे म्हणता येईल
- कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com