पॉल दी ऑक्‍टोपस नव्हे, आता ऍचिलस दी कॅट 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018


लढतींचा चार्ट, स्पर्धेचे वेळापत्रक सर्व काही दाखवले जात आहे. त्यानंतरच त्याला अंदाज वर्तवण्याच्या ठिकाणी नेले जाते. ऍचिलस आता त्याच्या कामाच्या ठिकाणीच स्पर्धा संपेपर्यंत असेल. त्याची विश्‍वकरंडकाची तयारी सुरू आहे. तो सर्व वातावरणाशी जुळवून घेत आहे. - ऍना कॉनद्रातिएवास, ऍचलिसच्या व्हेटरनरियन 

मॉस्को - विश्‍वकरंडक स्पर्धेचे वेध लागल्यापासून संभाव्य विजेत्यांबाबत चर्चा सुरू होते. त्यासाठी अनेक गोष्टींची मदत घेतली जाते. काही वेळा आर्थिक गणिते मांडली जातात, तर कधी खेळातील कौशल्य. अर्थातच, भविष्यवेत्तेही त्यात असतात. 2010 च्या स्पर्धेच्या वेळी पॉल दी ऑक्‍टोपसने अचूक अंदाजात बाजी मारली होती, तर या वेळी ऍचिलस दी कॅट बाजी मारेल, असे सांगितले जात आहे. 

सेट पीटर्सबर्गच्या हेमिटेज म्युझियममधील हे मांजर प्रत्येक सामन्यातील विजेत्याबाबत अंदाज वर्तवेल, असे सांगितले जात आहे. ऍचिलसचा अंदाज कितपत योग्य ठरतो, याबाबत त्याची तुलना पॉल दी ऑक्‍टोपसबरोबर कायम होईल. 2010 च्या स्पर्धेच्या वेळी त्याने जर्मनीच्या लढतीबाबत अचूक अंदाज वर्तवले होते. एवढेच नव्हे, तर या स्पर्धेची अंतिम लढत स्पेन जिंकणार, असे अचूक सांगितले होते. 

पूर्वीचा इम्पेरियल विंटर पॅलेस आता हेर्मिटेज झाले आहे. त्यात अनेक मांजरी आहेत. ऍचिलसला 2017 च्या कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेतील निकालाचा अनुभव आहे. त्याहीपेक्षा त्याला काही ऐकू येत नाही. त्यामुळे संघाच्या चाहत्यांनी किंवा पत्रकारांनी कोणत्याही देशाचे नाव ओरडले, तर त्यामुळे लक्ष विचलित होत नाही, असे सांगितले जाते. ऍचिलससमोर खाण्याचे दोन बाऊल्स ठेवले जातात. प्रत्येक बाऊलजवळ प्रतिस्पर्धी देशांचा ध्वज असतो. ज्यातील खाद्य ऍचिलस पहिल्यांदा खाईल तो संघ विजेता होईल, असे मानले जाते. 

चाहत्यांनी ऍचलिसला खूपच खाऊ घातले आहे, त्यामुळे तो फुटबॉलसारखा झाला होता. त्यामुळे त्याला डाएटवरही ठेवले होते, असेही सांगितले जाते. त्याची सर्वच तयारी सुरू आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीतून वेळ मिळाल्यावर तो चाहत्यांना आपल्यासोबत फोटोही काढून देतो. तो स्पर्धा कालावधीत खूप प्रसिद्ध होणार, सतत त्याचे फोटो काढले जाणार, त्यासाठीही तयार केले जात असल्याचे सांगितले जात आहे. 

लढतींचा चार्ट, स्पर्धेचे वेळापत्रक सर्व काही दाखवले जात आहे. त्यानंतरच त्याला अंदाज वर्तवण्याच्या ठिकाणी नेले जाते. ऍचिलस आता त्याच्या कामाच्या ठिकाणीच स्पर्धा संपेपर्यंत असेल. त्याची विश्‍वकरंडकाची तयारी सुरू आहे. तो सर्व वातावरणाशी जुळवून घेत आहे. - ऍना कॉनद्रातिएवास, ऍचलिसच्या व्हेटरनरियन 

Web Title: no Paul the Octopus, now Achilles the Cat