आता क्रिकेट निवड समितीदेखील बाद होणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

वार्षिक सभाच लोढा समितीने रद्द ठरविल्यामुळे सर्वच सदस्य पद गमाविण्याची चिन्हे

वार्षिक सभाच लोढा समितीने रद्द ठरविल्यामुळे सर्वच सदस्य पद गमाविण्याची चिन्हे

मुंबई/नवी दिल्ली - एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीची अखेरची बैठक उद्या (ता. ५) मुंबईत होईल, असे स्पष्ट संकेत लोढा समितीने दिले आहेत. सध्याच्या निवड समितीस संघनिवडीसाठीची ही अखेरची संधी असेल आणि तीही अपवाद म्हणून देण्यात आली असल्याचे लोढा समितीने भारतीय मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांना कळवले आहे. 
संघनिवडीसाठी सध्याची पाच सदस्यीय समिती पात्र आहे का, अशी विचारणा जोहरी यांनी ई-मेलद्वारे केली होती. त्यास लोढा समितीने सध्याची निवड समिती संघाची निवड करू शकेल; पण हा एकमेव अपवाद असेल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. भारतीय मंडळाचे सचिव हे निवड समितीच्या बैठकीचे निमंत्रक असतात. ते बैठकीस उपस्थित राहतात. बडतर्फ केलेल्या अजय शिर्के यांच्याऐवजी राहुल जोहरी हेच निमंत्रक असतील. 

संपूर्ण समितीच जाणार
निवड समितीचे अध्यक्ष तसेच सदस्यांची निवड भारतीय मंडळाचे बडतर्फ अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अर्ज मागवून, तसेच मुलाखत घेऊन केली होती. लोढा समितीच्या निकषानुसार जतीन परांजपे आणि गगन खोडा हे अपात्र ठरतात. उर्वरित तीन सदस्य एमएसके प्रसाद, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी एकत्रित १३ कसोटी आणि २५ एकदिवसीय लढती खेळले आहेत. 
निवड समिती सदस्यांची निवडही विभागानुसार केली होती. लोढा समितीने त्रिसदस्यीय समितीची सूचना केली आहे. भारतीय मंडळावर १९ जानेवारीस प्रशासक नेमले जातील. ते नवी घटना तयार करतील. त्याहीपेक्षा या निवड समितीची निवड झालेली वार्षिक सभाच लोढा समितीने रद्द केली आहे. त्यामुळे निवड समितीची नियुक्तीही रद्द होईल. 

कोणाची निवड होणार?
रोहित शर्मा तसेच अजिंक्‍य रहाणेच्या दुखापतीमुळे शिखर धवन तसेच त्रिशतकवीर करुण नायर संघात येऊ शकतील. दुखापतीमुळे रणजी लढत न खेळलेल्या अश्‍विनबाबतच्या निर्णयाकडेही लक्ष असेल. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, उमेश यादवही संघात असतील. केदार जाधव आणि मनीष पांडेही कायम राहतील, असेच संकेत आहेत. 

कोहलीच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब
मर्यादित षटकांच्या लढतीतही नेतृत्व करण्यास महेंद्रसिंह धोनीने नकार दिल्यामुळे उद्याच्या निवड समितीच्या बैठकीत विराट कोहलीची भारतीय संघाच्या कर्णधारपदी होणारी निवड ही औपचारिकताच असेल. कोहली नेतृत्व करणार असला, तरी मर्यादित षटकांच्या लढती तसेच कसोटीसाठी भिन्न संघ निवडण्याचा विचार होत आहे. 

Web Title: Now cricket selection committee going after?