अनंत अमुची ध्येयासक्ती... 

केदार ओक  
शनिवार, 31 डिसेंबर 2016

सरत्या वर्षात प्रत्येक क्षेत्रातील आढावा घेताना क्रीडा क्षेत्रातील अनेक घडामोडींपैकी दोन घटना अशा घडल्या, की ज्या जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींना प्रेरणा देत राहतील. आपल्या ध्येयासक्तीपर्यंत पोचण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती कशी असावी, हे क्रीडा क्षेत्रातील मायकेल फेल्प्स आणि युस्रा मार्दिनी या खेळाडूंच्या जगण्याच्या स्पर्धेवरून दिसते. 

सरत्या वर्षात प्रत्येक क्षेत्रातील आढावा घेताना क्रीडा क्षेत्रातील अनेक घडामोडींपैकी दोन घटना अशा घडल्या, की ज्या जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींना प्रेरणा देत राहतील. आपल्या ध्येयासक्तीपर्यंत पोचण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती कशी असावी, हे क्रीडा क्षेत्रातील मायकेल फेल्प्स आणि युस्रा मार्दिनी या खेळाडूंच्या जगण्याच्या स्पर्धेवरून दिसते. 

संवेदनशील मायकेल फेल्प्स 
सोबतचा फोटो आहे, भावनाविवश झालेल्या एका खेळाडूचा. शेवटचं ऑलिंपिक आणि शेवटची शर्यत खेळणाऱ्याचा. सोळा वर्षे ज्या खेळावर प्रेम केलं, त्याला सोडण्याचा दिवस. पंधरा वर्षांचा असताना तो पहिल्या ऑलिंपिक शर्यतीत पोहला. पहिल्या वेळी मेडल मिळालं नाही; पण एकोणीस वर्षांचा असताना अथेन्सला त्याने पहिलं ऑलिंपिक गोल्ड मेडल पटकावलं आणि पाठोपाठ अजून पाच. या सगळ्यांवर कडी मात करत तेवीस वर्षांचा असताना बीजिंगला तब्बल आठ सुवर्णपदके मिळविली. लंडनला सत्तावीस वर्षांचा असताना आणखीन चार सुवर्णपदके, फक्त 3 ऑलिंपिक गेम्समध्ये फेल्प्सने 18 गोल्ड आणि 4 इतर अशी 22 पदके मिळवली होती. फेल्प्सची निव्वळ अचंबित करणारी, अशक्‍य वाटेल अशी ही कामगिरी. 

उभ्या आयुष्यात एक जरी पदक मिळालं, तरी कोणताही सर्वसामान्य खेळाडू त्या आठवणींवर जन्म काढेल आणि इकडे या मनुष्याकडे तर काय नव्हतं; पण दोन अधिक दोन बरोबर चार असं इतकं सहज सोपं नेहमी असेलच असं नाही. इतकी पदकं, पैसा, मानमतारब हाताशी होता. माणूस सुखी समाधानी हवा ना; पण फेल्प्सच्या नशिबात ते सुख नव्हतं. घटस्फोटित आई-वडिलांचा एकलकोंडा झालेला, भावना नसलेला, स्वतःच्या विश्‍वात रममाण असलेला असा हा फेल्प्स. जन्मजात असलेली पोहण्यासाठी योग्य शरीरयष्टी आणि कौशल्य प्रशिक्षकाने त्याच्यावर घेतलेली आणि त्याने स्वतः केलेली प्रचंड मेहनत, यामुळे खेळात तो कुठेच कमी पडला नाही. एखाद्या रोबोप्रमाणे तो पोहत होता आणि एकामागून एक स्पर्धा जिंकत होता. सगळं उत्तम चाललेलं होतं; पण आतमध्ये कुठे तरी नक्की काही तरी गडबड होती. या रोबोटिक मनुष्यात कधी तरी बिघाड तर होणारच होता. फक्त कधी होणार हाच प्रश्‍न होता. एकदा ड्रग्स घेतानाचा त्याचा फोटो जगासमोर आला आणि मग खळबळ उडाली. मधेच त्याने निवृत्ती घेतली; पण लंडन ऑलिंपिक्‍ससाठी परत आला. तिथे जिंकला आणि मग पुन्हा निवृत्ती घेतली. त्यानंतर मगं खूप झालं स्विमिंग आणि जिंकणं. आता फक्त आयुष्यात मजा मारायची, असा निर्णय त्याने घेतला आणि मग त्याच धुंदीत एका रात्री दारूच्या नशेमध्ये वेगाने गाडी चालवण्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली. 

एका हव्याहव्याश्‍या वाटणाऱ्या डोहाच्या गर्तेत अडकण्याची ही सुरवात होती. फेल्प्स नैराश्‍येत गेलेला आणि आता एक असा नाजूक क्षण होता, जिथून केवळ दोनच मार्ग होते. एकतर वाहवत जाऊन अजून खोल तळाशी जाण्याचा आणि दुसरा जोरदार उसळी मारून वरती येण्याचा. पहिला मार्ग खूप सोपा होता आणि दुसरा अत्यंत कठीण; पण नशिबाने त्याला खालून पाय ओढणारे खेकडेवजा मित्र न भेटता वरून मदतीचे भक्कम हात मिळाले आणि मग स्प्रिंगबोर्डच्या वेगाने फेल्प्स वरती आला. 

सर्वांत मुख्य बदल म्हणजे फेल्प्स रोबो म्हणून न राहता एक माणूस बनला. ज्या भावना त्याने इतकी वर्षे दाबून ठेवल्या होत्या, त्या आता बंधनमुक्त होत्या. त्याचं मन मोकळं झालं, आपल्या तुटलेल्या वडिलांशी पुन्हा संबंध वाढवण्यात त्याने पुढाकार घेतला. प्रेमाची सततची वाताहत थांबवून कायमचं सेटल होण्याचा निर्णय घेतला. एका गोंडस मुलाचा बाबा म्हणूनही मिरवायला लागला आणि सर्वांत मुख्य म्हणजे पुन्हा स्विमिंग टॅंककडे वळला. मनाने तर तो शेपमध्ये आला होताच; पण मग तब्बल दीड वर्ष अथक मेहनत घेऊन त्याने शरीरयष्टी तयार केली. अमेरिकेच्या सिलेक्‍शन ट्रायल्समध्ये घवघवीत यश मिळवलं आणि ऑलिंपिकची तिकिटं हक्काने मिळवली. बरं रिओमध्ये नुसता हजेरीला दाखल झाला नाही, तर वयाच्या एकतिसाव्या वर्षी पाच गोल्ड मेडल्स आणि एक सिल्व्हर मेडल जिंकून दाखवली. एकूण मेडल्स 28. दुर्दम्य इच्छाशक्ती, अपार मेहनत याचा उत्तम परिपाक झाला, की असं काही तरी अफाट, भव्यदिव्य घडून येतं, हे फेल्प्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने जगासमोर आलं. 
त्याचं शेवटचं रडणं, तो आता एक चांगला संवेदनशील माणूस बनल्याची साक्ष आहे. फेल्प्सचं परत येणंही आपलं कुटुंब, आपले जवळचे मित्रमंडळ, एकूणच आपली सपोर्ट सिस्टीम यांच्यावरचा विश्‍वास दृढ करणारी घटना आहे. शेवटी एक सांगावसं वाटतं -

Being cold blooded is fine but having emotions is biggest epitome of humanbeing. 

असामान्य युस्रा मार्दिनी
सीरियाच्या दमास्कसला राहणारी ही मुलगी. 2016 च्या रिओ ऑलिंपिक्‍समध्ये पोहणाऱ्या एका असामान्य मुलीची ही गोष्ट. जेमतेम 13-14 वर्षांची ही मुलगी सीरियामध्ये पोहण्याच्या स्पर्धांमध्ये चमकत होती आणि सीरियामध्ये युद्ध लागलेलं. चार वर्षांपूर्वी त्यांचं घर एका हल्ल्यामध्ये उद्‌ध्वस्त झालं आणि त्यापाठोपाठ आयुष्यही. जिथे उद्याची सकाळ आपण पाहू की नाही, अशी परिस्थिती असताना कुठे पोहण्याचा सराव नि काय. सगळी नुसती फरफट चाललेली. 

शेवटी गेल्या वर्षी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी या मुलीने देश सोडून युरोपात पळून जायचा निर्णय घेतला आणि आपल्या बहीण आणि काही नातेवाइकांना सोबत घेऊन निघालीसुद्धा. काय काळीज असेल कल्पना करवत नाही. ज्या वयात संध्याकाळी आपल्या मुलीची डोळे लावून वाट बघणारे पालक असतात, त्या ठिकाणी आपल्या दोन लेकी एका अंधाऱ्या वाटेने निघाल्यात, त्या आई-बापाला काय झालं असेल, याचा विचार धस्स करून जातो. 

दमास्कस, लेबनॉन, तुर्कस्तान असा प्रवास करत हा जत्था ग्रीसला जाणार होता. हे सगळं चालू होतं स्मगलर्सच्या मदतीने. असे शेकडो हजारो सीरियन निर्वासित आसरा शोधत फिरत होते. तुर्कस्तानमधून स्मगलर्सनी यांच्या वीस जणांच्या बॅचला एका छोट्या बोटीत बसवून दिलं. त्या होडीची क्षमता होती फक्त 6-7 जणांची; पण जगण्याची भिक मागणाऱ्याला स्वतःची काही मतं नसतात. जे पदरी पडेल ते पवित्र मानून पुढे निघणं एवढं एकच त्यांच्या हातात होतं. इतके लोक भरल्यावर जे व्हायचं तेच झालं. अर्ध्या तासात त्या बोटीने हाय खाल्ली आणि समुद्रात बुडून जाण्याची तयारी सुरू झाली; पण सजीवांमध्ये जगण्याची उर्मी सर्वांत तीव्र असते. म्हणूनच मार्दिनी भगिनी आणि अजून एक दोघे जण समुद्रात उतरले. कल्पना करा हे सगळं रात्री घडत होतं. या तीन-चार जणांना ती बंद पडलेली बोट हाताने ढकलत किनाऱ्याला न्यायची होती. मार्दिनी म्हणते, ""आमच्या बोटीत एक सहा वर्षांचा छोटा मुलगा होता. अशा कठीण परिस्थितीत, जिथे मला स्वतःला जगण्याची खात्री नव्हती, तिथे मला लोकांना धीर द्यावा लागत होता. त्या लहान मुलाला मी तोंड वेंगांडून हसवण्याचा प्रयत्न करत होते.'' 

कुठून येतं हो इतकं धैर्य. मार्दिनी स्वतःशीच बोलते, की मी एक स्विमर आहे आणि मीच पाण्यात बुडून मरायचं, हे काही योग्य नाही. या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरच तब्बल तीन तासांच्या गोठवणाऱ्या थंडीत त्यांची बोट ग्रीसच्या किनाऱ्यावर येऊन स्थिरावते. त्या क्षणाला त्या वीस चेहऱ्यांनी जो आनंद अनुभवला असेल, त्याचं वर्णन शब्दात करणं केवळ अशक्‍य. 

इथे दुःख संपत नाही, चालूच आहे. पुन्हा स्मगलर्स. पुन्हा वेगवेगळे देश. पोलिसांचा ससेमिरा आणि सर्वांत महत्त्वाचं काय असेल तर म्हणजे स्वाभिमानाच्या रोज उडत असलेल्या चिंधड्या. आपण कुणालाही नकोय, ही भावनाच फार वाईट आहे. कित्येक दिवस गोठवणाऱ्या थंडीत दिवसभर रांगेत थांबून दुसऱ्या दिवशी परत येण्याचं फर्मान जेव्हा समोरचा पोलिस सोडतो, तेव्हा होणारा अपमान आणि आलेली अगतिकता. 
घटना खूप भिन्न आहेत, हे मान्य; पण आता दोन तास बॅंकांच्या रांगेत थांबायला मला नक्कीच काहीच वाटणार नाही. फक्त काही तरी चांगलं होणार आहे, हा आशावाद हवा. 
या आशावादाच्या जोरावरच पोरीने जर्मनीपर्यंत मजल मारली. तिथे एक स्विमिंग कोच मिळाला. त्याच्याबरोबर सराव सुरू केला. 2016 च्या गेम्ससाठी तयारी सुरू झाली; पण इकडे ऑलिंपिक संघटनेने या वर्षी रेफ्युजी टीम पाठवायचा निर्णय घेतला. त्यात तिचा नंबर लागला. सगळं कसं पटापट होत गेलं. जिंकणार तर ती नव्हतीच; कारण ती अव्वल स्विमर्सच्या अजून खूप मागे आहे. स्विमिंग पूलमधली शर्यत ती जिंकणार नसली, तरी जगण्याची शर्यत तिने केव्हाच जिंकलेली आहे. ती आणि तिचे तीन साथीदार यांनी वीस जणांचे प्राण वाचवून मृत्यूला केव्हाच हरवलंय. ऑलिंपिकचं पदक तिला पुढेमागे मिळेल नं मिळेल; पण तिच्या स्पीरिटने ज्या लाखो ज्योती पेटल्या आहेत, त्याचं मोल काही औरच आहे. 

"संकटात लहान मुलासारखं रडणं मला पटत नाही. त्या संकटांमुळेच मला ताकद दिली आहे आणि मी माझी ठरवलेली ध्येयं नक्कीच पूर्ण करणार'- युस्रा मार्दिनी आमेन 

Web Title: Olympic glod medalist