ऑलिंपिकच्या स्वप्नासाठी कोल्हापूरच्या रेश्माच अख्खं घरदारच दिल्ली मुक्कामी...

बी. डी. चेचर
बुधवार, 11 डिसेंबर 2019

रेश्मा माने ही कोल्हापूरची दंगल गर्ल... या महिला कुस्तीपट्टूने अनेक मैदाने जिंकली, आता तिने ऑलिंपिक जिंकण्याचे स्वप्न पाहिले आहे.. आणि हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिचे कुटूंबच तिच्या सोबत दिल्लीत पोहचले आहे.

कोल्हापूर - ऑलिंपिकच्या पदकाचे ध्येय बाळगलेल्या सुगंधा ऊर्फ रेश्‍मा माने हिच्या सरावासाठी अख्खं घरदार दिल्लीत ठाण मांडून आहे. महाराष्ट्रातील महिला कुस्तीगिरांत रेश्‍माचा दबदबा असून, ती सातासमुद्रापार देशाचं नाव उज्ज्वल करत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी तिने कंबर कसली आहे.

आणि... ठरलं रेश्‍माला कुस्तीपट्टू बनवायचं

अनिल माने यांची ही कन्या. माने यांना कुस्तीची आवड. वडणगे येथील जय किसान क्रीडा मंडळात रेश्‍मा लहान असताना तिला ते कबड्डीच्या मैदानावर सरावासाठी घेऊन जात. त्यांचे भवानी मंडपात रसवंती गृह असल्याने मोतीबाग तालमीतील मल्लांशी त्यांचा सपंर्क होता. त्याच वेळी त्यांनी रेश्‍माला मल्ल करायचे ठरवले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने पैशाची तजवीज करणे कठीण होते. घरखर्चात काटकसर करत माने यांनी मुलीच्या खुराकाकडे लक्ष दिले.

२०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी कसली कंबर

छत्रपती शिवाजी स्टेडियममधील क्रीडाप्रबोधिनीत रेश्‍माने कुस्तीशी नाते घट्ट केले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांनी तिला मॅटवरील कुस्तीचे धडे दिले. त्याचवेळी रेश्‍माने ऑलिंपिकमध्ये पदक पटकाविण्याचा निर्धार केला. ठिकठिकाणच्या कुस्ती मैदानात छाप पाडून प्रेक्षकांना अप्रतिम डाव दाखवले. श्री. माने यांनी रेश्‍माच्या सरावात कोणतीही कसूर केली नाही. ते पहाटे चारला सरावासाठी क्रीडाप्रबोधिनीत तिला घेऊन जात राहिले. छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित उन्हाळी शिबिरातील सहभाग तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला. कुस्तीशी असलेली नाळ तिची अधिकच घट्ट झाली. शालेय स्तरावर तिने कुस्तीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. विजयाच्या गदा हातात घेतल्याने तिची पदकांची भूक वाढत गेली. जिद्द आणि चिकाटी कशी असावी हा माने कुटुंबात दिसणारा गुण रेश्‍माने कृतीतून दाखविला. पंधरा वर्षांच्या खडतर प्रवासात तिच्या भावंडांनीही तिच्यासमवेत कठोर सराव केला. छत्रपती शाहू महाराज, आमदार चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेश्माच्या दिमतीला घरदारच दिल्लीला पोहचलंय

वडणगेतील तिच्या घरी असलेल्या छत्रपती शाहू महाराज तालमीत जोमाने सराव सुरू आहे. सध्या ती दिल्लीत कठोर मेहनत घेत आहे. तिची काळजी घेण्यासाठी वडील अनिल, आई कल्पना, भाऊ सचिन, युवराज, ऋषिकेश, संजीवनी भीमराव माने दिल्लीत किमान अडीच महिने तिच्यासमवेत राहणार आहेत. तिला आवश्‍यक असणाऱ्या आहाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for olympics dreams reshmas family in delhi