उष्ण हवामानात शेल्बीचा हॉट विजय 

shebly
shebly

मेलबर्न - मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पहिल्या दिवशी उष्ण हवामानाचीच चर्चा होती. 32 अंश सेल्सिअस तापमानामुळे खेळाडूंना टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळून थोडाफार दिलासा मिळवावा लागला. मंगळवारी तापमान 38 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अशा प्रतिकूल वातावरणात महिला एकेरीत तीन बिगरमानांकित अमेरिकी खेळाडूंनी मानांकित प्रतिस्पर्ध्यांना हरविले. यात चौथ्या मानांकित सिमोना हालेपचा अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सकडून झालेला पराभव अनपेक्षित ठरला. 

जागतिक क्रमवारीत 52 व्या स्थानावर असलेल्या शेल्बीने सिमोनाला चार गेमच्या मोबदल्यात हरविले. गेल्या वर्षीसुद्धा ती पहिल्याच फेरीत हरली होती. सिमोनाने पूर्वतयारी चांगली केली होती. ऑस्ट्रेलियातील उष्ण हवामानाशी जुळवून घेता यावे, म्हणून ती नाताळच्या सुटीपासून येथे राहत होती. प्रशिक्षक डॅरेन कॅहिल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव केला होता; पण तिला अपेक्षित खेळ करता आला नाही. गेल्या वर्षीसुद्धा ती पहिल्याच फेरीत हरली होती. तिला दुसऱ्या सेटदरम्यान वेगवान हालचाली करता आल्या नाहीत. अमेरिकेच्या कोको वॅंडेवेघे हिने 15 व्या मानांकित रॉबर्टा व्हिंची, तर वार्रवा लेपचेंकोने 19 व्या मानांकित किकी बर्टेन्सला हरविले. 

व्हिनसची आगेकूच 
अनुभवी व्हिनसने अमेरिकेला जल्लोषाची संधी दिली. कारकिर्दीत 17 व्या वेळी या स्पर्धेत सहभागी झालेल्या व्हिनसने युक्रेनच्या कॅटरिना कोझ्सोवाला दोन सेटमध्ये हरविले. व्हिनस 36 वर्षांची आहे. तिने 1994 मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. कॅटरिनाचा जन्म त्या वर्षी झाला होता. 

केर्बरची सलामी 
गतविजेत्या आणि अग्रमानांकित अँजेलिक केर्बरला 51 व्या स्थानावरील लेसिया त्सुरेंकोने तीन सेटपर्यंत झुंजविले. दुसऱ्या सेटमध्ये विजयासाठी सर्व्हिस राखण्याची गरज असताना अँजेलिकचे फटके चुकले. त्यामुळे तिने सर्व्हिस गमावली. निर्णायक सेटमध्ये मात्र 4-2 अशी आघाडी घेत तिने विजय नक्की केला. 

पुरुष एकेरीत अव्वल मानांकित अँडी मरेने इल्या मार्चेन्कोवर दोन तास 47 मिनिटांत मात केली. या तुलनेत केई निशीकोरी आणि मरिन चिलीच यांना पाच सेटपर्यंत झगडावे लागले. स्टॅन वॉव्रिंका आणि रॉजर फेडरर यांनीही आगेकूच केली. 

निकाल (पहिली फेरी) 
महिला एकेरी ः शेल्बी रॉजर्स (अमेरिका) विवि सिमोना हालेप (रुमानिया 4) 6-3, 6-1. व्हिनस विल्यम्स (अमेरिका 13) विवि कॅटरिना कोझ्लोवा (युक्रेन) 7-6 (7-5), 7-5. अँजेलिक केर्बर (जर्मनी 1) विवि लेसिया त्सुरेंको (युक्रेन) 6-2, 5-7, 6-2. गार्बीन मुगुरुझा (स्पेन 7) विवि मरिना एराकोविच (न्यूझीलंड) 7-5, 6-4. कोको वॅंडेवेघे (अमेरिका) विवि रॉबर्टा व्हिंची (इटली 15) 6-1, 7-6 (7-3). वार्वरा लेपचेंको (अमेरिका) विवि किकी बर्टेन्स (नेदरलॅंड्‌स 19) 7-5, 7-6 (7-5). 

पुरुष एकेरी ः अँडी मरे (ब्रिटन 1) विवि इल्या मार्चेन्को (युक्रेन) 7-5, 7-6 (7-5), 6-2. स्टॅन वॉव्रिंका (स्वित्झर्लंड 4) विवि मार्टिन क्‍लिझॅन (स्लोव्हाकिया) 4-6, 6-4, 7-5, 4-6, 6-4. केई निशीकोरी (जपान 5) विवि आंद्रे कुझ्नेत्सोव (रशिया) 5-7, 6-1, 6-4, 6-7 (6-8), 6-2. मरिन चिलीच (क्रोएशिया 7) विवि जेर्झी यानोविच (पोलंड) 4-6, 4-6, 6-2, 6-2, 6-3. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा (फ्रान्स 12) विवि थियागो मॉंटेरो (ब्राझील) 6-1, 6-3, 6-7 (5-7), 6-2. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड 17) विवि जुर्गेन मेल्झर (ऑस्ट्रिया) 7-5, 3-6, 6-2, 6-2.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com