सिंधूने काढले रिओचे उट्टे

पीटीआय
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई -  पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिंपिकमधील कॅरोलिन मरिनविरुद्धच्या पराभवाचे दिमाखात उट्टे काढले. तिने शुक्रवारी मरिनला जागतिक सुपर सिरीज बॅडमिंटन फायनल्समधील निर्णायक साखळी लढतीत हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. ऑलिंपिक विजेत्या मरिनला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही.

मुंबई -  पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिंपिकमधील कॅरोलिन मरिनविरुद्धच्या पराभवाचे दिमाखात उट्टे काढले. तिने शुक्रवारी मरिनला जागतिक सुपर सिरीज बॅडमिंटन फायनल्समधील निर्णायक साखळी लढतीत हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. ऑलिंपिक विजेत्या मरिनला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही.

सिंधूने दुबईत सुरू असलेल्या या स्पर्धेत सून यीविरुद्धचा पराभव जणू मागे सारत सुरवातीपासून आक्रमक खेळ केला आणि 21-17, 21-13 असा विजय संपादला. सिंधूने मरिनविरुद्ध प्रथमच लढतीवर पूर्ण हुकूमत राखली. तिच्या आक्रमकतेसमोर मरिन कोलमडली. मरिनने दोघीतील गेल्या दोन लढती जिंकल्या होत्या, पण सिंधूने तिला विजयाच्या हॅट्ट्रिकपासून वंचित ठेवले.

जिंकलो तरच आव्हान कायम राहणार याची सिंधूला पुरेपूर कल्पना होती. सिंधूने सुरवातीची 2-0 आघाडी गमावल्यानंतरही तिने कमी चुका करत मरिनवरील दडपण वाढवले. गेमच्या मध्यानंतर 12-12 अशा स्थितीत सलग चार गुण जिंकताना सिंधूने मारलेले ड्रॉप्स जबरदस्त होते. तिने मरिनचे स्मॅशही सुरेख परतवले.

दुसऱ्या गेमपूर्वी मरिनने दुखावलेल्या पायावर उपचार करून घेतले, तरीही तिने 3-1 आघाडी घेतली. सिंधूने सलग चार गुण घेत सिंधूला आज आपलाच दिवस असल्याचा इशारा दिला. बेसलाइनवरून चांगला खेळ करणाऱ्या सिंधूच्या अचूक प्लेसमेंटने मरिन जेरीस आली. सिंधू प्रतिस्पर्धीस कोर्टभर नाचवत होती आणि काही वेळातच तिचा विजय तसेच उपांत्य फेरी निश्‍चित झाली.

सिंधूचा जागतिक संघटनेकडून गौरव
ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा जागतिक बॅडमिंटन महासंघाने सर्वाधिक प्रगतिशील खेळाडू म्हणून गौरव केला. हा पुरस्कार मला अपेक्षित नव्हता. याचा सुपर सिरीज फायनल्स स्पर्धेत नक्कीच फायदा होईल, असे सिंधूने सांगितले. तिला हा पुरस्कार अमिराती टेबल टेनिस तसेच बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष दाऊद अल हाजरी यांच्या हस्ते देण्यात आला.

Web Title: p v sindhu