सहकाऱ्यांनो सावध व्हा, वेळीच कामगिरी सुधारा : सर्फराज 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

अपयश ही सांघिक जबाबदारी आहे, असे सांगून सरफराज म्हणाला, ""स्पर्धेत आपली कामगिरी चांगली झालेली नाही. मायदेशात आपल्याविरोधात वातावरण आहे. ते आणखी कडक करायचे नसेल, तर जबाबदारी ओळखून खेळ करा. नाही, तर आपल्या सगळ्यानांच त्याचे परिणाम सहन करावे लागणार आहेत.'' 

लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर मायदेशातून कडव्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातही भारताविरुद्धच्या पराभवानंतर हा रोष अधिक वाढला आहे. त्याचे वाढते दडपण आता पाकिस्तानी खेळाडूंवर येत आहे आणि त्याचे पडसाद संघ नियोजनाच्या बैठकीत उमटले. 

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमद याने आपल्या सहकाऱ्यांना जवळजवळ धमकावलेच आहे. "आपल्या कामगिरीत सुधारणा करा. जबाबदारीने खेळा. केवळ मी एकटाच मायदेशात परतणार नाहीये, तर आपल्या सगळ्यांनाच मायदेशात परतायचे आहे. पाकिस्तानी चाहत्यांच्या संतापाला सामोरे जायचे नसेल, तर वेळीच भानावर या,' अशा कडक शब्दात सरफराजने संघ नियोजनाच्या बैठकीत सहकाऱ्यांना सुनावल्याचे समोर येत आहे. 

अपयश ही सांघिक जबाबदारी आहे, असे सांगून सरफराज म्हणाला, ""स्पर्धेत आपली कामगिरी चांगली झालेली नाही. मायदेशात आपल्याविरोधात वातावरण आहे. ते आणखी कडक करायचे नसेल, तर जबाबदारी ओळखून खेळ करा. नाही, तर आपल्या सगळ्यानांच त्याचे परिणाम सहन करावे लागणार आहेत.'' 

संघ नियोजनाच्या बैठकीत सरफराजने सहकाऱ्यांना हे सांगितल्याचे वृत्त आहे. सरफराज बोलत असताना सर्व खेळाडू निमूटपणे सगळे ऐकून घेत होते. त्याचे बोलणे झाल्यावरही त्यांनी चकार शब्द काढला नसल्याचे समजते. शोएब मलिक, महंमद हाफिज यांच्यासह संघातील अन्य वरिष्ठ खेळाडूदेखील न बोलताच आपल्या रुममध्ये परतल्याचे वृत्त आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan captain Sarfaraz Ahmed warn team members