मुस्लिम असल्यानेच शमीची कामगिरी सर्वोत्तम; पाक क्रिकेटपटूचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जुलै 2019

महंमद शमीने चार सामन्यांमध्ये 14 बळी घेतलेले आहेत. तसेच त्याने हॅटट्रिकही नोंदविलेली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीचे कौतुक होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने याचा धर्माशी संबंध जोडला आहे. 

नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी जबरदस्त होत असताना, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने महंमद शमी हा मुस्लिम असल्यामुळेच सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचे म्हटले आहे.

महंमद शमीने चार सामन्यांमध्ये 14 बळी घेतलेले आहेत. तसेच त्याने हॅटट्रिकही नोंदविलेली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीचे कौतुक होत असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने याचा धर्माशी संबंध जोडला आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताचा या स्पर्धेतील पहिला पराभव होता. मात्र त्यानंतर भारताने मंगळवारी बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत उपांत्य फेरीमध्ये जागा पक्की केली. असे असली तरी भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये अजूनही भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचीच चर्चा सुरु आहे. याच पराभवाचे विश्लेषण करताना पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त म्हणाले, की भारताकडे सर्वोत्तम गोलंदाज आहेत. बुमरा तर जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने विकेट घेतली नाही तर कुलदीप यादव विकेट घेतो. चहलही भारतासाठी हुकूमी एक्का आहे. आता तर शमीनेही आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून खेळणारा शमी मुस्लीम आहे ही चांगली गोष्ट आहे. मी भारताची गोलंदाजी पाहिली आहे. भारताचे मुख्य गोलंदाज इंग्लंविरुद्ध चालले नाहीत. यावद आणि चहलची इंग्लडच्या फलंदाजांनी धुलाई केली. त्यामुळेच इंग्लंडला 337 धावांपर्यंत मजल मारता आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan former cricketer Sikander Bakhts religious comment on Mohammad Shami