पाक हॉकीला हवी भारताची साथ

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागासाठी पैशांची चणचण असलेल्या पाकिस्तान हॉकी महासंघासही भारताची मदत हवी आहे. भारत-पाकिस्तान मालिकेसाठीच आता आपण सर्वप्रथम प्रयत्न करणार असल्याचे पाकिस्तान हॉकी महासंघाचे नवे सचिव आसिफ बाजवा यांनी सांगितले.

कराची : आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागासाठी पैशांची चणचण असलेल्या पाकिस्तान हॉकी महासंघासही भारताची मदत हवी आहे. भारत-पाकिस्तान मालिकेसाठीच आता आपण सर्वप्रथम प्रयत्न करणार असल्याचे पाकिस्तान हॉकी महासंघाचे नवे सचिव आसिफ बाजवा यांनी सांगितले.

बाजवा यांच्याकडे गेल्या महिन्यात पाकिस्तान हॉकीची सूत्रे सोपवण्यात आली. भारत-पाकिस्तान मालिका हे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले, पण त्याच वेळी त्यांनी यादृष्टीने आपण अद्याप प्रयत्न सुरू केले नसल्याचे सांगितले.
भारताविरुद्धच्या मालिकेबाबत अद्याप कोणाबरोबरही मी चर्चा केलेली नाही, पण हेच माझे प्रमुख लक्ष्य आहे. दोन देशांतील मालिकेचे पुनरुज्जीवन लवकरच होईल, असे मला मनापासून वाटत आहे असे त्यांनी सांगितले.

आपण भारतास या मालिकेसाठी तयार केले तर पाकिस्तान हॉकीसाठी ते फायदेशीर होईल, तसेच पाकिस्तान हॉकीचे आर्थिक प्रश्‍नही सुटतील असे ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरची मालिका 2006 मध्ये झाली होती; मात्र त्यानंतर दोन देशांतील वाढत्या तणावामुळे ही मालिका झालेली नाही. त्यातच भुवनेश्‍वर येथील स्पर्धेत भारतास पराजित केल्यानंतर पाक हॉकीपटूंनी आक्षेपार्ह हावभाव केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धा सोडून भारत पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळणार नाही, हे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.

बाजवा आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचे चांगले संबंध आहेत असे सांगितले जाते. बत्रा जागतिक हॉकी महासंघाचे अध्यक्ष आहेत. बाजवा यांनी आपण बत्रा यांची भेट घेण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. त्यांनी भारत-पाक मालिका पूर्वीप्रमाणे होम अँड अवे होऊ न शकल्यास त्रयस्थ ठिकाणी होऊ शकेल असेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan hockey may seek india's help