भारतातील आशियाई खो-खोत पाकही खेळणार?

नवी दिल्लीतील आशियाई खो-खो स्पर्धेत पाकिस्तानही खेळण्याची शक्यता आहे
नवी दिल्लीतील आशियाई खो-खो स्पर्धेत पाकिस्तानही खेळण्याची शक्यता आहे

मुंबई : पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील खो-खो लीगच्या वातावरण निर्मितीसाठी भारतीय खो-खो महासंघाने आशियाई स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत खो-खोचा समावेश करण्यासाठी होत असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तानही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

आशियाई खो-खो स्पर्धा 28 जानेवारीपासून होणार आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 18 ते 20 संघ सहभागी होतील, असा भारतीय खो-खो महासंघास विश्‍वास आहे. त्यात पाकिस्तानचाही सहभाग आहे, असे भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी सांगितले. त्यागी आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचेही सचिव आहेत.

पाकिस्तानचा या स्पर्धेत निश्‍चितच सहभाग असेल. या संघाच्या सहभागासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे आम्ही जवळपास पूर्ण करीत आणली आहेत. ते काम 90 टक्के झाले आहे, त्यामुळे पाकिस्तानच्या सहभागाबाबत कोणताही प्रश्‍न असणार नाही, असे त्यागी यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी ही स्पर्धा इंदिरा गांधी स्टेडियम किंवा त्यागराज स्टेडियममध्ये असेल, असे सांगितले.

आशियाई स्पर्धा यापूर्वी इंदूरला झाली होती. त्यावेळी दहा संघांचा सहभाग होता. या वेळी इराण, इराक, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार आणि भूतान यांचा सहभाग असेल. या संघांनी केवळ सहभागी होऊ नये, त्यांचा दर्जाही उच्च असावा यासाठी भारतीय खो-खो महासंघाने कुवेत, इराण, इराक, सिंगापूर, नेपाळ, श्रीलंका यांसारख्या संघांकडे मार्गदर्शक पाठवले आहेत, असेही त्यागी यांनी सांगितले.

टीव्ही प्रक्षेपणाचा करार अंतिम टप्प्यात
आशियाई खो-खो स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. आमची सोनी क्रीडा वाहिनीबरोबर 22 तारखेला चर्चा आहे. त्यात सर्व स्वरुप ठरेल. आमची स्टारबरोबरही चर्चा सुरू आहे. आम्हाला लवकरात लवकर याबाबतचा करार करायचा आहे, असे त्यागी यांनी सांगितले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com