World Cup 2019 : पाकसाठी आज जिंका नाहीतर घरी निघा!

PakvsNz match preview_1.jpg
PakvsNz match preview_1.jpg

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पुढील प्रवासात पाकिस्तानसाठी प्रत्येक सामना करो वा मरो या स्थितीचा असणार आहे. या प्रवासात आज ते अपराजित न्यूझीलंडशी दोन हात करतील. सर्वाधिक सातत्य राखणारा विरुद्ध सर्वांत बेभरवशी कामगिरी अशी ओळख असणारा संघ असा हा सामना होणार आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासाचे आकडे वेगळेच बोलत असतील, पण सध्या न्यूझीलंड संघाला रोखणे त्यांच्यासाठी नक्कीच कठिण गणित सोडविण्यासारखेच आहे. पाकिस्तानने आपल्या यशा अपयशाच्या चढउतारात स्पर्धेतील रंगत कामय राखली असे फार तर त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून म्हणता येईल. 

न्यूझीलंडने पाच विजय मिळवून उपांत्य फेरी गाठल्यासारखे आहे. उद्याच्या सामन्यात त्यांनी विजय मिळविल्यास त्यावर फक्त उपांत्य फेरीची मोहर उमटेल. कर्णधार केन विल्यम्सन कमालीच्या सातत्याने खेळत आहे. पाठोपाठच्या दोन शतकी खेळीने त्याने हे सिद्ध केले आहे. रॉस टेलरची त्याला चांगली साथ मिळत आहे. जीमी निशाम, कॉलीन डी ग्रॅंडहोम हे तळातील फलंदाज जबाबदारीने खेळत आहेत. मात्र, चांगली सुरवात ही न्यूझीलंडची सध्याची मोठी डोकेदुखी आहे. मार्टिन गुप्टिल, कॉलिन मुन्‍रो यांना आपल्या कामगिरीत लय राखता आलेली नाही. टॉड लॅथमही मधल्या फळीत चमक दाखवू शकलेला नाही. त्यानंतरही त्यांचे आव्हान उभे रहात आहे. यात गोलंदाजीचा वाटा मोठा आहे. फिरकी गोलंदाजीपेक्षा त्यांचे वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्धी संघांसाठी धोकादायक ठरत आहेत. तरी प्रतिहल्ला केल्यास हे गोलंदाजही लय गमावून बसतात हे दोन दिवसांपूर्वी कार्लोस ब्रेथवेटने दाखवून दिले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांना याचा विचार करावा लागेल. 

पाकिस्तान संघविषयी भाकित करणे सर्वांत कठिण असते. भारताविरुद्ध हरल्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करताना त्यांनी आपला बदललेला खेळ दाखवून दिला आहे. तोच खेळ त्यांना पुढे खेळायचा आहे. पण, त्यासाठी त्यांना क्षेत्ररक्षणाच्या आघाडीवर सुधारणा करावी लागणार आहे. स्पर्धेत सर्वात खराब क्षेत्ररक्षण त्यांचे राहिले आहे. प्रशिक्षक मिकी आर्थर आणि माजी क्रिकेटपटू या विषयी सुरवातीपासून बोलत आहेत. मात्र, पाकिस्तानला अजून ते जमलेले नाही. त्यामुळे त्यांना सामन्यात एखाद वेळेस बॅकफूटवर जावे लागत आहे. शोएब मलिकला वगळून हॅरिस सोहेलला खेळविण्याचा निर्णय योग्य ठरला असून, त्याच्याकडन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली त्याच कामगिरीची पुनरावृत्ती संघ व्यवस्थापनाने बाळगल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 

सामन्या दरम्यान हलकासा पाऊस पडण्याचा, तसेच हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात महंमद अमीर आणि ट्रेंट बोल्ट यांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com