पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

संक्षिप्त धावफलक -
दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 8 बाद 219 (डेव्हिड मिलर नाबाद 75, 104 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, क्विन्टॉन डिकॉक 33, हाशिम आमला 16, फाफ डु प्लेसिस 26, ख्रिस मॉरीस 28, कगिसो रबादा 26, हसन अली 3-24, जुनैद खान 2-53, इमाद वसीम 2-20 महम्मद हफीज 1-51) पराभूत वि. पाकिस्तान 27 षटकांत 3 बाद 119 (फखर झमान 31, बाबर आझम नाबाद 31, शोएब मलिक नाबाद 16, मॉर्ने मॉर्केल 3-18)

एजबस्टन - भारतविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानने चँपियन्स करंडकातील आपले आव्हान जिवंत ठेवले असून, बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला.

पाकिस्तानी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजांना जखडून ठेवले आणि अचूक गोलंदाजांची जोरावर विकेटही मिळविल्या. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत 8 बाद 219 धावापर्यंतच मजल मारता आली होती. त्यानंतर पाकिस्तानने सुरवात चांगली केली होती. मात्र, सलामीवीर एकापाठोपाठ बाद झाल्याने अडचणीत आलेल्या पाकिस्तानने सावध फलंदाजी केली. त्यांनी 27 षटकांत 3 बाद 119 धावा केल्या होत्या. मात्र, जोरदार पावसामुळे खेळ थांबवावा लागला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 19 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
 
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संधीचा त्यांचे फलंदाज लाभ उचलू शकले नाही. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने आजही लवकरच चेंडू फिरकीपटूंच्या हाती सोपविला. इमाद वसीमने आमलाला बाद करून दक्षिण आफ्रिकेवर दबाब टाकण्यास सुरुवात केली. इमादनेच ए.बी. डिव्हीलियर्सला शून्यावर बाद करून दडपण आणखी वाढविले. एकापाठोपाठ एक दिग्गज बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची 29 षटकांत 6 बाद 118 अशी स्थिती होती. हसन अलीने सलग दोन चेंडूवर ड्युमिनी आणि फलंदाजीत बढती मिळालेल्या वेन पार्नेलला बाद केले. मात्र, डेव्हिड मिलरने प्रथम ख्रिस मॉरिससोबत आणि नंतर कगिसो रबादासोबत अनुक्रमे 47 व 48 धावांची भागीदारी केल्याने दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांचा पल्ला पार करता आला. 

पाकिस्तानचे सलामीवीर फखर झमान आणि अझर अली यांनी 40 धावांची भागीदारी केल्यानंतर मॉर्केलने ही जोडी फोडली. झमान 31 धावांवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ अझर अलीही बाद झाला. बाबर आझम आणि मोहम्मद हाफीज यांनी अर्धशतकी भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला. हाफीजला मॉर्केलनेच 26 धावांवर बाद केल्यानंतर शोएब मलिकने बाबरला साथ दिली. मात्र, 27 व्या षटकानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. पुन्हा खेळ सुरु न होऊ शकल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून, एक विजय मिळविलेला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पोचण्यासाठी या दोन्ही संघांना संधी आहे.

संक्षिप्त धावफलक -
दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 8 बाद 219 (डेव्हिड मिलर नाबाद 75, 104 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, क्विन्टॉन डिकॉक 33, हाशिम आमला 16, फाफ डु प्लेसिस 26, ख्रिस मॉरीस 28, कगिसो रबादा 26, हसन अली 3-24, जुनैद खान 2-53, इमाद वसीम 2-20 महम्मद हफीज 1-51) पराभूत वि. पाकिस्तान 27 षटकांत 3 बाद 119 (फखर झमान 31, बाबर आझम नाबाद 31, शोएब मलिक नाबाद 16, मॉर्ने मॉर्केल 3-18)

Web Title: Pakistan win by 19 runs against South Africa in Champions Trophy