पाकिस्तानी गोलंदाजांचा बोगसपणा अन् वय लपवालपवीचा खेळ!

 mohammad asif,  pakistani cricket Team, pakistani pacers
mohammad asif, pakistani cricket Team, pakistani pacers

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचे खरं वय काय? हा प्रश्न क्रिकेट वर्तुळात अनेकदा चर्चेचा ठरला आहे. त्याचे मित्र देखील त्याला वयासंदर्भात विचारतात. लॉकडाऊनमध्ये आफ्रिदीच्या एका चाहत्यानेही त्याला वयावरुन प्रश्न विचारत बाउन्सर मारला होता. पण ' ये राज है राज ही रहने दो'... अस म्हणत त्याने उत्तर देण टाळलं होतं. त्याच्या वयानंतर आता पाकिस्तानी संघातील गोलंदाजांच्या वयातही लपवालपवीचा खेळ सुरु असल्याचे समोर येत आहे. 

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही संघ बॅकफूटवर असून न्यूझीलंडने त्यांच्यासमोर मोठे आव्हान ठेवले आहे. दरम्यान पाकिस्तान संघातील अंतर्गतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाकिस्तान संघाचा माजी जलदगती गोलंदाज मोहम्मद आसिफने पाकिस्तानच्या संघातील गोलंदाजांसदर्भात मोठा दावा केला आहे. संघातील गोलंदाजांचे वय हे कागदावर 17-18 दिसत असले तरी वास्तविक ते 27-28 असते, असा खळबळजनक दावा त्याने केला आहे.   

यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल याच्यासोबत यू-ट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात मोहम्मद आसिफने खळबळजनक वक्तव्य केले. सध्याच्या घडीला पाकिस्तानी गोलंदाज कसोटीमध्ये 20 विकेट घेण्यात अपयशी का ठरत आहेत? असा प्रश्न अकमलने मोहम्मद आसिफला विचारला होता. यावेळी अकमलने आसिफसह, शोएब अख्तर, वसीम आक्रम, वकार यूनिस यांच्यात 20 विकेट घेण्याची क्षमता होती, असे सांगत सध्याच्या घडीला संघात असलेल्या गोलंदाजांवरही निशाणा साधला.  

मोहम्मद आसिफ म्हणाला की,  एखाद्या पाकिस्तानी गोलंदाजाने एका सामन्यात 10 विकेट घेतल्याचे मागील 5-6 वर्षांत पाहायला मिळालेले नाही. ज्यावेळी मी गोलंदाजी करायचो त्यावेळी 5 विकेट घेण्याचे टार्गेट घेऊनच मैदानात उतरायचो. संघातील गोलंदाजांना विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यात अपयश येत आहे. चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात ते अपयशी ठरत आहेत, असेही मोहम्मद आसिफ म्हणाला.  

संघातील गोलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करताना मोहम्मद आसिफने गोलंदाजांच्या वयात गोलमाल असल्याचे म्हटले आहे. गोलंदाजांचे पेपरवरील वय हे 17-18 असले तरी प्रत्यक्षात त्यांचे वय 27-28 पेक्षा कमी नाही. त्यामुळे त्यांच्यात अधिक काळ गोलंदाजी करण्याची क्षमता नाही. 5-6 षटकांच्या कोट्यातच ते हतबल होतात, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com