पंकज अडवाणीचे 23 वे जगज्जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पंकज अडवाणीने कारकिर्दीतील 23 वे जागतिक विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने आदित्य मेहताच्या साथीत जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पंकज, आदित्यचा समावेश असलेल्या भारत एक संघाने निर्णायक लढतीत थायलंड दोन संघाला हरवले.

मुंबई : पंकज अडवाणीने कारकिर्दीतील 23 वे जागतिक विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने आदित्य मेहताच्या साथीत जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पंकज, आदित्यचा समावेश असलेल्या भारत एक संघाने निर्णायक लढतीत थायलंड दोन संघाला हरवले.

पंकजने 23 वे जागतिक विजेतेपद जिंकले; तर मुंबईच्या आदित्य मेहताने पहिल्यांदाच ही कामगिरी केली. त्यांनी निर्णायक लढतीत सी पॉंगसकोर्न डी पोरामिन यांना 5-2 असे हरवले. भारतीय जोडीने ही लढत 65-31, 9-69, 74-8, 21-64, 55-44, 72-23, 83-9 अशी जिंकली.

भारतीय जोडीने या लढतीत सहाव्या; तसेच तिसऱ्या फ्रेममध्ये अर्धशतकी ब्रेक केला होता. पंकजने हे जागतिक विजेतेपद दुसऱ्यांदा जिंकले. यापूर्वी त्याने 2018 मध्ये ही कामगिरी केली होती. हे त्याचे एकंदर तिसरे सांघिक जागतिक विजेतेपद आहे. जागतिक सांघिक बिलियर्डस्‌ स्पर्धा त्याने 2014 मध्ये जिंकली होती.

भारतीयांनी उपांत्य फेरीत थायलंडच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीस हरवले होते. सकाळच्या सत्रात उपांत्य लढत खेळल्यावर पंकज-आदित्यला त्याच दिवशी अंतिम लढत खेळणे भाग पडले. तरीही त्यांनी एकतर्फी वर्चस्वाचा धडाका कायम राखला. दरम्यान, लक्ष्मण रावत आणि कमल चावला यांचा भारत दोन संघात समावेश होता. ते उपांत्य फेरीत थायलंड दोन संघाविरुद्ध 2-4 असे पराजित झाले होते.

दरम्यान, पंकजचे हे पंधरा दिवसातील हे दुसरे जगज्जेतेपद आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच बिलियर्डस्‌च्या 150 गुणांच्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती. मात्र त्याचे स्नूकरचे वैयक्तिक जागतिक विजेतेपद लक्ष्मण रावतविरुद्ध उपांत्य फेरीत पराजित झाल्यामुळे हुकले होते. अर्थात लक्ष्मणनेच अंतिम फेरीत बाजी मारली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaj advani won 23rd world championship