यष्टिरक्षक कोण, पंत की साहा?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड करताना निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रिषभ पंत हाच भारताचा अव्वल यष्टिरक्षक असेल, असे सांगितले होते; पण त्यानंतरच्याच मालिकेसाठी कोण यष्टिरक्षक असावा, हेच प्रसाद यांच्या निवड समितीस उमगले नाही. रोहित शर्माची निवड करून सलामीचा प्रश्‍न सोडवलेल्या प्रसाद यांच्या निवड समितीने यष्टिरक्षकाची निवड संघ व्यवस्थापनाच्या गळ्यात टाकली.
 

मुंबई / नवी दिल्ली : विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड करताना निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी रिषभ पंत हाच भारताचा अव्वल यष्टिरक्षक असेल, असे सांगितले होते; पण त्यानंतरच्याच मालिकेसाठी कोण यष्टिरक्षक असावा, हेच प्रसाद यांच्या निवड समितीस उमगले नाही. रोहित शर्माची निवड करून सलामीचा प्रश्‍न सोडवलेल्या प्रसाद यांच्या निवड समितीने यष्टिरक्षकाची निवड संघ व्यवस्थापनाच्या गळ्यात टाकली.

रिषभ पंत गुणवान आहे, त्याला सर्व प्रकारांत जास्तीत जास्त संधी देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितलेल्या प्रसाद यांची भूमिका काही महिन्यांत बदलली. मायदेशात मालिका असल्याने त्या वातावरणात साहा योग्य यष्टिरक्षक ठरेल. रिषभ पंत हाच आमच्यासाठी पहिली पसंती आहे, पण भारतीय खेळपट्ट्यांवरील त्याच्या कौशल्याबाबत संघ व्यवस्थापनास शंका आहेत. आता अंतिम संघातील निवडीचा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल, असे सांगत प्रसाद यांनी आपली जबाबदारी जणू झटकली.

संघ व्यवस्थापनास पंतच्या कौशल्याबाबत शंका असल्याचे प्रसाद सांगतात, पण कोहलीने रिषभ पंतकडे आम्ही भविष्याचा विचार करून बघत आहोत. तो गुणवान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दडपणास सामोरे जाणेही महत्त्वाचे असते, असे सांगितले होते.

दरम्यान, निवड समितीने अपेक्षेनुसार केएल राहुलऐवजी रोहित शर्माची सलामीवीर म्हणून निवड केली. त्याचवेळी रोहित तसेच सलामीचा सहकारी मयांक अगरवाल यांची अध्यक्षीय संघातही निवड केली. त्यांना कसोटीपूर्वी आफ्रिका गोलंदाजीचा सामना करण्याची संधीच एकप्रकारे दिली आहे. कसोटीपूर्वीच्या सराव सामन्याचा रोहितला नक्कीच फायदा होईल, असे निवड समिती अध्यक्षांनी सांगितले.

नवोदित शुभमन गिल याचीही संघात निवड करण्यात आली आहे. तो केवळ सलामीसाठीच नाही तर मधल्या फळीसाठीही पर्याय असेल, असे सांगितले जात आहे. आता विंडीज मालिकेसाठीचा कसोटी संघ आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कसोटी संघ हा विचार केल्यास शुभमन गिलची राहुलऐवजी निवड झाली आहे. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या प्राथमिक संघातही रोहित होता. विंडीज दौऱ्याच्यावेळी संघाबाहेर ठेवल्यानंतर गिलने किमान एका संघात निवड अपेक्षित होती, असे सांगितले होते. त्याने विंडीज "अ' विरुद्ध द्विशतक आणि आफ्रिका "अ' विरुद्ध 90 धावा केल्या आहेत.

रोहितही सलामीस खेळण्यास कमालीचा उत्सुक आहे. आम्ही सदस्यही त्यासाठी तयार आहोत. त्याला सलामीला खेळवण्याची संधी देत आहोत. त्याला हा अनुभव मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नक्कीच आहे. तो कसोटीतही सलामीला यशस्वी झाल्यास नक्कीच चांगले होईल.
- एमएसके प्रसाद, निवड समिती अध्यक्ष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pant or saha, selectors undecided