pro kabaddi 2019 : हरियाना स्टिलर्सकडूनही पाटणाचा पराभव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

हरियाना स्टिलर्स संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात बुधवारी झालेल्या सामन्यात पाटणा संघाचा 35-26 असा पराभव केला. त्यापूर्वी तमिळ थलैवा आणि यूपी योद्धाज संघांमधील लढत 28-28 अशी बरोबरीत सुटली.

प्रदीप नरवालच्या 900 गुणांच्या विक्रमाचेच यजमानांना समाधान 
पाटणा - पाटणा पायरेटस्‌च्या प्रदीप नरवालने प्रो कबड्डीत चढाईतील नऊशे गुणांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम केला. मात्र, त्यानंतरही त्याला घरच्या मैदानावरील पाटणा संघाचा पराभव वाचवता आला नाही. हरियाना स्टिलर्स संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात बुधवारी झालेल्या सामन्यात पाटणा संघाचा 35-26 असा पराभव केला. त्यापूर्वी तमिळ थलैवा आणि यूपी योद्धाज संघांमधील लढत 28-28 अशी बरोबरीत सुटली. 

आजच्या सामन्यातही त्याने गुणांचा सपाटा लावताना 14 गुण मिळविले. मात्र, यासाठी त्याने 22 चढाया केल्या आणि पाच वेळा त्याची पकड झाली. पाटणा संघाकडून अन्य एकाही खेळाडूला आपला खेळ दाखविता आला नाही. 

त्याउलट हरियाना संघाच्या विकास कंडोलाचे 10 गुण आणि त्याला विनय (6) आणि रवी कुमार, सुनीलकडून मिळालेली प्रत्येकी चार गुणांची साथ यामुळे हरियानाचे एक पाऊल पुढे राहिले. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)  पूर्वार्धात पहिल्या दहा मिनिटांत स्वीकारावा लागलेल्या लोणपासून पाटणा संघ सतत मागेच राहिला. उत्तरार्धातही त्यांना आणखी एक लोण स्वीकारावा लागला. यातही विकासची कामगिरी निर्णायक ठरली. पाटणाला दिलेल्या दोन लोणच्या वेळी विकासने दोन खेळाडूंत यशस्वी चढाई करत दोन्ही खेळाडूंना टिपले. 

दरम्यान, यूपी योद्धा तमिळ थलैवाज यांच्यातील लढत 28-28 अशी बरोबरीत सुटली. यूपीची ही स्पर्धेतील सलग दुसरी बरोबरी. भक्कम बचावामुळे त्यांना हार टाळता आली. त्यांनी सुपर टॅकलच्या संधी चांगल्या साधल्या. मात्र, त्यांना विश्रांतीची 16-11 ही एकतर्फी आघाडी राखता आली नाही. या लढतीत एकाही आक्रमकास पाचपेक्षा जास्त गुण घेता आले नाहीत. अखेरच्या चढाईत अजय ठाकूरने वेगवान खेळ करून मिळविलेल्या एका गुणाने तमिळला लढत बरोबरीत सोडवता आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patna also lost to Haryana Steelers