लेवानडोवस्कीच्या दोन गोलांमुळे पोलंडचा सराव सामन्यात विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

रॉब्रेट लेवानडोवस्कीने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर पोलंडने लिथुवानियाचा 4-0 असा पराभव करून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वी आत्मविश्‍वासाला बळ दिले. मुख्य स्पर्धेपूर्वीचा हा अखेरचा मित्रत्वाचा आणि सराव सामना होता. 

वार्सव - रॉब्रेट लेवानडोवस्कीने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर पोलंडने लिथुवानियाचा 4-0 असा पराभव करून विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेपूर्वी आत्मविश्‍वासाला बळ दिले. मुख्य स्पर्धेपूर्वीचा हा अखेरचा मित्रत्वाचा आणि सराव सामना होता. 

विश्‍वकरंडकच्या पात्रता स्पर्धेत लेवानडोवस्कीने 16 गोल केले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या मुख्य स्पर्धेपूर्वी लेवानडोवस्कीचा फॉर्म पोलंडसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. लिथुवानियाविरुद्धच्या सामन्यात त्याने 19 व्या मिनिटाला पहिला गोल केला. क्‍लब फुटबॉलमध्ये बायरन म्युनिककडून खेळणाऱ्या या 29 वर्षीय स्टारने 33 व्या मिनिटाला आपल्या ताकदीवर फ्री-किकने दुसरा गोल केला. 

मुख्य स्पर्धेसाठी तो तंदुरुस्त राहावा आणि या मित्रत्वाच्या सामन्यात कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून लेवानडोवस्कीला उत्तरार्धात राखीव खेळाडू करण्यात आले. तरिही पोलंडची ताकद कमी झाली नाही. 71 व्या मिनिटाला कोवान्कीने 3-0 आणि 82 व्या मिनिटाला ब्लाझयोवस्कीने पेनल्टीवर गोल केले. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत पोलंदाजचा "ह' गटात समावेश असून, त्यांना साखळीत कोलंबिया, सेनेगल आणि जपानचा सामना करायचा आहे. 

Web Title: poland win the practice match