ब्लाइंडर तुटला, तरी पूजाचा पदक वेध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पूजाला ग्रेड वनची नोकरी मिळणार?

पूजा घाटकरला काही आठवड्यांपूर्वीच राज्य सरकारने ग्रेड टूची नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. अद्याप याबाबतचा आदेश निघालेला नाही. निवडणुकीची आचारसंहिता लवकरच संपेल, त्यामुळे तिला आता या यशामुळे ग्रेड वनची नोकरी देण्यात यावी, अशी इच्छा तिच्या काही चाहत्यांनी व्यक्त केली. 

मुंबई - विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक हुलकावणी देऊन जात होते. गतवर्षी दोनदा हे घडले होते, त्यामुळे रिओ ऑलिंपिक हुकले होते. हा फेरा दिल्लीत संपणार असे वाटत असतानाच विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीतील अंतिम टप्प्यात अनपेक्षित घडले. ब्लाइंडर तुटून पडला, पण पूजा घाटकर डगमगली नाही. तिने ब्राँझ पदकाचे लक्ष्य साधत जणू टोक्‍यो ऑलिंपिक स्पर्धेची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे सुरू केली.

नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर पूजाने विश्‍वकरंडकाच्या प्राथमिक फेरीतील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ४१८ गुणांचा वेध घेत दुसरा क्रमांक मिळविला. पहिल्या चौघीत तीन चिनी आणि पूजा होती. तीने चीनला निर्विवाद वर्चस्वापासून रोखले, पण हे सहजपणे घडले नाही.

अंतिम फेरीत २४ शॉट्‌सच्या या स्पर्धेत १५ व्या शॉट्‌सच्या वेळी पूजाचा ब्लाइंडर तुटला. हा ब्लाइंडर लक्ष्य साधताना एका डोळ्यानेच लक्ष्य साधण्यास मदत करीत असतो. ‘‘ब्लाइंडर तुटल्यामुळे काय करावे हेच कळले नाही. तो बदलण्यास वेळ नव्हता. मग एक डोळा बंद करून लक्ष्य साधण्याचे ठरवले. त्यानंतरचा पहिला शॉट्‌स ९.९ असल्याने मी मागे गेले. पण पदक दवडू दिले नाही, असे पूजाने सांगितले.  पूजा आणि चीनची वु मिंगयांग यांच्यात ब्राँझ पदकासाठी कडवी लढत सुरू होती. दोघीतील अंतर ०.२ गुणांचे होते, त्याचवेळी पूजाने १०.८ गुणांचा वेध घेत पदक निश्‍चित केले. तिने एकंदर २२८.८ गुणांचा वेध घेतला. चीनच्या मेंगयान शी हीने २५२.१ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

दरम्यान, दीपक कुमार आणि रवी कुमारने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली, पण ते पदकापासून दूर राहिले. दीपक पाचवा तर रवी आठवा आला. या प्रकारातही चीनच्याच बुहान साँग याने बाजी मारली. महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत भारताकडून पात्रतेत सर्वोत्तम कामगिरी करणारी राजेश्वरी कुमार सतरावी आली. पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पहिल्या टप्प्यानंतर गुरप्रीत सिंग बारावा आहे, तर पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत भारताचा झोरावर सिंग सध्या सहावा आहे. 
 

पूजाला ग्रेड वनची नोकरी मिळणार?

पूजा घाटकरला काही आठवड्यांपूर्वीच राज्य सरकारने ग्रेड टूची नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. अद्याप याबाबतचा आदेश निघालेला नाही. निवडणुकीची आचारसंहिता लवकरच संपेल, त्यामुळे तिला आता या यशामुळे ग्रेड वनची नोकरी देण्यात यावी, अशी इच्छा तिच्या काही चाहत्यांनी व्यक्त केली. 

Web Title: pooja ghatkar