चारपैकी तीन मानांकित गारद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पुणे - एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत गुरुवारचा दिवस मानांकितांसाठी धक्कादायक ठरला. उपांत्यपूर्व फेरीत चारपैकी तीन लढतींमध्ये सरस मानांकन असलेले स्पर्धक गारद झाले. यात भारताच्या प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन याने देशबांधव साकत मायनेनी याच्यावर केलेली मात सनसनाटी ठरली.

पुणे - एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत गुरुवारचा दिवस मानांकितांसाठी धक्कादायक ठरला. उपांत्यपूर्व फेरीत चारपैकी तीन लढतींमध्ये सरस मानांकन असलेले स्पर्धक गारद झाले. यात भारताच्या प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन याने देशबांधव साकत मायनेनी याच्यावर केलेली मात सनसनाटी ठरली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या चुरशीची तीव्रता किती वाढू शकते, याची प्रचिती उपस्थित टेनिसप्रेमींना आली. अग्रमानांकित व गतउपविजेता येवगेनी डॉनस्कॉय बिगरमानांकित सॅडिओ डौम्बियाकडून हरला. चौथ्या मानांकित अड्रीयन मेनेंडेझ-मॅसैरासला दोन क्रमांक खालचे मानांकन असलेल्या निकोला मिलोजेविच याच्याकडून शह बसला. केवळ द्वितीय मानांकित डकही ली याने आव्हान अबाधित राखले. त्याने सातव्या मानांकित दिमित्री पॉप्कोला दोन सेटमध्ये हरविले.

साकेतने टायब्रेकमध्ये गेलेला पहिला सेट जिंकून सुरवात चांगली केली होती; पण दुसरा सेट त्याने गमावला. त्यानंतर निर्णायक सेटमध्ये तो खांद्याच्या दुखापतीमुळे सर्वस्व पणास लावून खेळू शकला नाही. साकेतला दुखापत झाली असली, तरी प्रज्ञेशने केलेला खेळ कौतुकास्पद ठरला. दीड तास चाललेल्या लढतीत साकेतला शारीरिक क्षमता सतत पणास लावणे शक्‍य नव्हते. डकही याने चिवट खेळ कायम ठेवला. त्याने एक तास सहा मिनिटांत विजय संपादन केला. अग्रमानांकन पणास लागलेल्या डॉनस्कॉयने एक तास 57 मिनिटे झुंज दिली; पण निर्णायक सेटमध्ये तो खेळ उंचावू शकला नाही. अड्रीयन आणि निकोला यांच्यातील सामनाही एक तास 57 मिनिटे चालला.

एकेरीचे निकाल (उपांत्यपूर्व) : येवगेनी डॉनस्कॉय (रशिया 1) पराभूतविरुद्ध सॅडिओ डौम्बिया (फ्रान्स) 6-3, 4-6, 4-6. साकेत मायनेनी (3) पराभूतविरुद्ध प्रज्ञेश गुण्णेश्‍वरन (8) 7-6 (7-5), 2-6, 0-6. अड्रीयन मेनेंडेझ-मॅसैरास (स्पेन 4) पराभूतविरुद्ध निकोला मिलोजेविच (सर्बिया 6) 4-6, 6-7 (3-7), डकही ली (कोरिया 2) विजयी विरुद्ध दिमित्री पॉप्को (कझाकिस्तान 7) 6-3, 6-4.

Web Title: Popular players down in Challender Tennis