ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

ब्राझील हा जगातील सर्वाधिक फुटबॉलवेडा देश असल्याचा आजपर्यंतचा समज निल्सन स्पोर्टसच्या एका सर्वेक्षणानंतर दूर होणार आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली आहे. 
 

झ्युरिच - ब्राझील हा जगातील सर्वाधिक फुटबॉलवेडा देश असल्याचा आजपर्यंतचा समज निल्सन स्पोर्टसच्या एका सर्वेक्षणानंतर दूर होणार आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार ब्राझीलमधील फुटबॉलची लोकप्रियता घटली आहे. 

या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार संयुक्त अरब अमिराती फुटबॉलच्या लोकप्रियतेत आघाडीवर राहिले आहे. निल्सन स्पोर्टस कंपनीने लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार 30 देशांची क्रमवारी तयार केली आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिराती येथे सर्वाधिक 80 टक्के जनता फुटबॉलला "फॉलो' करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर थायलंड (78), चिली, पोर्तुगाल आणि तुर्की (प्रत्येकी 75 टक्के) यांचा क्रमांक आला आहे. पाच वेळा विश्‍वविजेते राहिलेला ब्राझीलमध्ये फुटबॉल "फॉलो' करणारे 60 टक्केच चाहते असून, क्रमवारीत त्यांना थेट 13वे स्थान मिळाले आहे. 

टक्केवारीत गट 
ब्राझीलमधील फुटबॉलच्या चाहत्यांमध्ये घट झाल्याचे यावरून सिद्ध होते. याच कंपनीने 2013 मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात ब्राझीलमध्ये 72 टक्के चाहते होते. गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत जर्मनीकडून उपांत्य फेरीत 7-1 असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतरच त्यांचे चाहते कमी झाला, असा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये होणाऱ्या सामन्यासाठीची उपस्थिती ही कोणत्या संघांचा सहभाग, हवामान आणि सामन्याची वेळ यावर अवलंबून असते. ब्राझीलच्या गेल्या मोसमात फुटबॉल सामन्यांना सरासरी 16,418 इतकीच उपस्थिती होती. 

खेळाडूंची वैयक्तिक माहिती घेतली असता पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे सर्वाधिक चाहते सोशल मीडियावर असून, त्याच्यानंतर नेमारने मेस्सीवर आघाडी घेतली आहे. 

लोकप्रियता घटली तरी 
विश्‍वकरंडक स्पर्धेतील सामने पहायला मिळावेत, यासाठी ब्राझील सरकारने अधिकृतरीत्या कार्यालये, बॅंका, शाळा यांच्या वेळा बदलल्या आहेत. ब्राझीलच्या वेळेनुसार तेथे ब्राझीलचा सामना सकाळी 10 वाजता होणार आहे. 

Web Title: popularity of football in Brazil has decreased