पोर्तुगाल अंतिम फेरीत

अमोल गोखले - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जुलै 2016

आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान बाळगला पाहिजे. आम्ही मैदानावर झोकून देऊन खेळ केला, तर मैदानाबाहेर या कामगिरीचा अन्‌ फुटबॉलचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सर्व चाहत्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानायचे आहेत. त्यांची साथ अत्यंत अनोखी आहे.

- गॅरेथ बेल

 

या स्पर्धेतील कामगिरीद्वारे आम्ही भविष्याचा पाया रचला आहे. या संघाची वाटचाल येथेच संपलेली नाही. ते आणखी बरीच मजल मारू शकतात.

- ख्रिस कोलमन, वेल्सचे प्रशिक्षक

लिऑन - स्पर्धेच्या सुरवातीपासून त्याच्या वैयक्तिक खेळावर आणि त्याच्या संघाच्या कामगिरीवर टीका झाली होती. पण, असे खेळाडू अव्वल का असतात हे सिद्ध करीत ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने गॅरेथ बेलच्या वेल्सला २-० असे हरवत अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला.

‘स्ताद दे लियॉन’ येथे बुधवारी झालेल्या सामन्यात रोनाल्डोने हेडरद्वारे गोल नोंदवला व दुसऱ्या गोलच्यावेळी नानीला पास दिला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी एकमेकांचा खेळ आजमावला. काहीशा राटाळवाण्या पूर्वार्धात ०-० अशी बरोबरी राहिली.

 

उत्तरार्धात, पोर्तुगालने जोरदार सुरवात केली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. राफाइल गुरेरोने दिलेल्या क्रॉस वर रोनाल्डोने वेल्सच्या खेळाडूंपेक्षा जास्त उंच उडी घेत, चेंडू गोलरक्षक वेन हेनेसीच्या आवाक्‍यापालीकडे जाळ्यात धाडला आणि त्याच्या नेहमीच्या पद्धतीने जल्लोष केला.

 

तीन मिनिटांतच पोर्तुगालने आघाडी वाढविली. रोनाल्डो परत एकदा सर्व घडामोडीत सामील होता. त्याने दिलेल्या पासवर त्याचा मॅंचेस्टर युनायटेडमधील एकेकाळचा सहकारी नानीने चेंडू जाळ्यात अचूक मारला.

 

२-० पिछाडीवरून वेल्सने पुनरागमानासाठी कसोशीने प्रयत्न केले; पण त्यांच्या संघाचा स्टार खेळाडू बेल याला संघास प्रोत्साहित करण्यात अपयश आले. बेलचा खेळदेखील त्याच्या लौकिकास साजेसा होऊ शकला नाही. पोर्तुगालचा सामना आता यजमान फ्रान्स आणि विश्वविजेता जर्मनी यांच्यातील विजेत्या संघाशी रविवारी ‘स्ताद दे फ्रान्स’ येथे होईल.

 

‘रोनाल्डो नाइट’

ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांची सातत्याने तुलना होत राहते. क्‍लबकडून खेळताना दोघांनी अगणित विक्रम रचले आहेत, पण राष्ट्रीय संघाकडून खेळताना दोघांनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत परत एकदा पराभूत झाल्याने मेस्सीने केलेली निवृत्तीची घोषणा ताजी आहे. रोनाल्डोसाठी मात्र ही स्पर्धा संस्मरणीय ठरते आहे. या सामन्यात एक गोल नोंदवून त्याने मिचेल प्लॅटिनी यांच्या युरोमधील नऊ गोलांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

 

अंतिम सामन्यात गोल नोंदवून तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू होऊ शकतो.

 

दृष्टिक्षेपात

 या स्पर्धेत निर्धारित वेळेत पोर्तुगालचा प्रथमच निर्णायक विजय

 पोर्तुगाल २००४ मध्ये मायदेशातील स्पर्धेनंतर प्रथमच अंतिम फेरीत

 २००४ मध्ये त्यांचा ग्रीसकडून १-२ असा पराभव

 युरो स्पर्धेत तीन वेळा उपांत्य फेरीत खेळणारा रोनाल्डो पहिलाच खेळाडू (२००४, २०१२, २०१६)

 युरो स्पर्धेत रोनाल्डो २० सामन्यांत सहभागी. जियानलुईजी बुफॉन, बॅस्टीयन श्‍वाईनस्टायगर यांचे प्रत्येकी १७ सामने

 रोनाल्डोचे नऊपैकी पाच गोल हेडर

 प्रमुख स्पर्धांत सात प्रयत्नांत पोर्तुगाल उपांत्य फेरीत दुसऱ्यांदाच विजयी

 

लियॉन अन्‌ रोनाल्डो

साखळी सामन्यात रोनाल्डोने दोन गोल नोंदवले होते. ते दोन्ही गोल हंगेरी विरुद्ध त्याने लियॉन येथेच केले होते. कालचा सामनादेखील लियॉन येथे झाला. साखळी सामन्यात तसेच बाद फेरीत रोनाल्डोचा खेळ चांगला झाला नव्हता, पण काल त्याने ‘फॉर्म इज टेम्पररी, क्‍लास इज पर्मनंट’ या उक्तीप्रमाणे खेळ करून वर्चस्व गाजवले. त्याचा हेडर गोल ही त्याची प्रचिती देतो.

 

Web Title: Portugal 2-0 Wales: Heartbreak for Wales as quick-fire double from Ronaldo and Nani ends Euro 2016 dream