साई प्रणीतच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्रॉंझ पदक जिंकलेल्या बी साई प्रणीतचे चायना ओपन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या.

मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्रॉंझ पदक जिंकलेल्या बी साई प्रणीतचे चायना ओपन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले. त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या.

चॅंगझोऊ येथे सुरू असलेल्या सुपर एक हजार मालिकेतील स्पर्धेत दहा लाख डॉलरचे बक्षीस आहे. त्यात जगज्जेती पी. व्ही. सिंधू तसेच पारुपली कश्‍यप दुसऱ्या फेरीत, तर साईना नेहवाल पहिल्या फेरीत पराजित झाली होती. आता आशा केवळ प्रणीतवरच होत्या, पण तो अँथनी गिनतिंग याच्याविरुद्ध तीन गेममध्ये पराभूत झाला.

प्रणीतने गिनतिंगविरुद्ध सलामीचा गेम जिंकला, त्यावेळी जागतिक स्पर्धेप्रमाणेच गिनतिंगला पराजित करेल, असे वाटले होते. मात्र प्रणीत या 55 मिनिटांच्या लढतीत 21-16, 6-21, 16-21 असा पराभूत झाला. बाजू बदलल्यावर प्रणीतचा सूर हरपत होता. दुसऱ्या गेममध्ये त्याचा प्रभाव पडला नाही, तर पहिली गेम जिंकलेल्या बाजूस असताना निर्णायक गेम खेळताना त्याचे वर्चस्व होते. त्याने त्यावेळी 2-6 पिछाडीनंतर खेळ उंचावला होता. त्याने अकरापैकी 10 गुण जिंकत 12-7 आघाडी घेतली होती, पण बाजू बदलली गेल्यावर त्याचा खेळ खालावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: praneet lost in china open