प्रणॉय, समीर वर्माची झटपट सलामी, जागतिक बॅडमिंटन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नानजिंग (चीन) / मुंबई : एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय मोहिमेस जोरदार सुरुवात करताना झटपट विजय मिळविला. त्याचबरोबर समीर वर्माने भारतीय आगेकूच कायम राखली. महिला दुहेरीतील अपयश सोडल्यास भारतास सलामीला धवल यश लाभले. 

नानजिंग (चीन) / मुंबई : एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय मोहिमेस जोरदार सुरुवात करताना झटपट विजय मिळविला. त्याचबरोबर समीर वर्माने भारतीय आगेकूच कायम राखली. महिला दुहेरीतील अपयश सोडल्यास भारतास सलामीला धवल यश लाभले. 

प्रणॉयने नानजिंग ऑलिंपिक स्पोर्टस सेंटरवरील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडच्या अभिनव मानोटा याला 21-12, 21-11 असे 28 मिनिटांत हरवताना जणू आगामी लढतींचा सरावच केला. गतवर्षी तो दुखापतीमुळे या स्पर्धेस मुकला होता. या वेळी त्याने सलामीला प्रतिस्पर्ध्यास कोणतीही संधी दिली नाही. पहिल्या सर्व्हिसपासून त्याची हुकूमत सिद्ध झाली. प्रणॉयने ब्रेकला 11-4 आघाडी घेत निकाल स्पष्ट केला होता. 

स्मॅश आणि ड्रॉप्सचा धडाका करताना प्रणॉयने प्रतिस्पर्ध्यास चुका करण्यास भाग पाडले. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीस मानोटा अचानक आक्रमक झाला, त्यामुळे प्रणॉयच्या खेळाची लय काहीशी बिघडली, पण त्याने सावरत अंतर कमी होऊ दिले नाही आणि 28 मिनिटांतच विजय मिळविला. आता त्याची लढत ब्राझीलच्या गॉर कोएल्होविरुद्ध होईल. 

समीर वर्माने फ्रान्सच्या ल्युकास कॉर्वी याला 21-13, 21-10 असे हरवताना दुसऱ्या फेरीतील खडतर लढतीसाठी ताकद राखून ठेवली. त्याची लढत लिन दानविरुद्ध होणार आहे. पहिल्या गेममध्ये सुरुवातीस चुरस झाली, पण त्यानंतर समीरचे एकतर्फी वर्चस्व होते. पहिल्या गेममध्ये 3-5 पिछाडीनंतर सलग सात गुण घेत त्याने लढतीचा निकालच स्पष्ट केला. 

दुहेरीत भारतीयांचा धडाका 
अश्‍विनी पोनप्पा- सात्विक साईराज रानकिरेड्डी यांनी मिश्र दुहेरीत सलामीला डेन्मार्कच्या जोडीला 36 मिनिटांतच हरवले. या लढतीतील दुसरी गेम जादा गुणांवर गेली. प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डीने चेक प्रजासत्ताकच्या जोडीला दोन गेममध्येच नमवले. हीच कामगिरी सौरभ शर्मा-अनुष्का पारेखने नायजेरियाच्या जोडीविरुद्ध केली. रोहन कपूर-कुहू गर्गने कॅनडाच्या जोडीला संधी न देता 28 मिनिटांतच विजयाची औपचारिकता पूर्ण केली. महिला दुहेरीत प्राजक्ता सावंत-संयोगिता घोरपडे दोन गेममध्ये 34 मिनिटांत पराभूत झाल्या. 

हेही लक्षवेधक 
- ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता चेन लॉंग याने तैवान जेन हाओ सु याच्याविरुद्ध 69 शॉटस्‌ची रॅली जिंकली. 
- सहाव्या जगज्जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या लीन दानचा 49 मिनिटांत विजय. 
- अग्रमानांकित तसेच गतविजेता व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेनची 26 मिनिटांतच सरशी. 

भारतीयांसमोरील आजचे आव्हान 
- बी. साई प्रणीतची कोर्टवर उतरण्यापूर्वीच सरशी. चौथ्या मानांकित सॉन वॅन हो याची माघार. 
- दहाव्या मानांकित साईनाची लढत तुर्कीच्या आलिया देमिरबॅगविरुद्ध. दोघीतील ही पहिलीच लढत. देमिरबॅग जागतिक क्रमवारीत 72 वी. 
- किदांबी श्रीकांतची लढत आयर्लंडच्या गुएन न्हात याच्याविरुद्ध. दोघांत पहिलीच लढत. जागतिक क्रमवारीत श्रीकांत सहावा, तर गुएन 87 वा. 

Web Title: Prannoy, Sameer Verma's instant openers, World Badminton