माझे काम केवळ धावा करण्याचे ः पृथ्वी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

माझे काम केवळ धावा करण्याचेच आहे. माझ्या जास्तीत जास्त धावा कशा होतील, संघासाठी सामने कसे जिंकून देता येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्याचेच माझे काम आहे. संघनिवडीचा निर्णय निवड समिती घेत असते, असे सांगताना जणू पृथ्वी शॉ भविष्यात माझी फक्त बॅट बोलत राहील, असेच सांगत होता.

मुंबई : माझे काम केवळ धावा करण्याचेच आहे. माझ्या जास्तीत जास्त धावा कशा होतील, संघासाठी सामने कसे जिंकून देता येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्याचेच माझे काम आहे. संघनिवडीचा निर्णय निवड समिती घेत असते, असे सांगताना जणू पृथ्वी शॉ भविष्यात माझी फक्त बॅट बोलत राहील, असेच सांगत होता.

उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याबद्दलची बंदी संपल्यानंतर पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि लगेचच त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची चर्चा सुरू झाली. "मी केवळ धावा करीत राहणार आहे. संघनिवडीचा निर्णय निवड समितीचा असतो. माझे काम केवळ धावा करणे आणि संघाला विजयी करण्याचे आहे,' असे पृथ्वीने सांगितले.

बंदीच्या कालावधीबाबत विचारल्यावर पृथ्वीला बोलणे अवघड जात होते. "या प्रकारचे काही घडेल, असे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. मी खूपच निराश झालो होतो. सुरुवातीचे 20-25 दिवस तर हे काय झाले, हेच कळत नव्हते; मात्र दिवस सरत गेले. मी लंडनला फिरायला गेलो. त्या वेळी काहीसा शांत झालो; पण तरीही 15 सप्टेंबरपर्यंत सराव करता येणार नाही, हे सलत होते. पण त्याच वेळी तीन महिने गेल्यावर सराव करू शकतो, हे मनाला समजावत होतो; पण तरीही सरणारा प्रत्येक दिवस त्रासदायक होता. आता हे सर्व सरले आहे, असे त्याने सांगितले.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी आपल्याला पुनरागमनासाठी साह्य केल्याचे पृथ्वीने आवर्जून सांगितले. तो म्हणाला, लंडनहून परतलो, त्या वेळीही बंदी कायम होती. काय करावे हे कळत नव्हते; मात्र त्यानंतर काही दिवसातच राहुल (द्रविड) सरांचा फोन आला. त्यांनी मला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणास येण्यास सांगितले. त्या वेळी मी तिथे यो-यो टेस्टही दिली. राहुल सरांनी माझ्या फिटनेसकडे खूपच लक्ष दिले. त्याचबरोबर सरावाच्या वेळी कुलदीप यादव, भुवनेश्वर, वरुण ऍरॉनसारखे गोलंदाज होते. राहुल सरांनी मला खूपच मदत केली.

बंदी असतानाच्या कालावधीत अनेकांनी पाठबळ दिले. वडील (पंकज), क्रिकेटपटू, मार्गदर्शक होतेच तसेच चाहत्यांनीही प्रोत्साहित केले. अर्थात त्यानंतरही कधी कधी निराश होत असे. बंदी संपण्याचा दिवस जवळ येऊ लागल्यावर पुनरागमनासाठी तयारी सुरू केली. त्या वेळी मी स्वतःला कोंडून घेतले असते तर जास्त दडपण आले असते.

बंदीच्या कालावधीत खूप काही शिकलो. मी चूक केली होती. या कालावधीत मी लोकांपासून दूर गेलो होतो. त्यांचे काही ऐकत नव्हतो. त्यातून अधिक कणखरपणे बाहेर पडणार आहोत, हेच स्वतःला सांगत होतो. या सर्व कालावधीत वडील माझ्यापाठीमागे भक्कमपणे उभे होते. 14, 16 वर्षाखालील सामने खेळत असताना जशी त्यांची साथ होती, तसेच ते आत्ताही होते. ते कायम असतील.
- पृथ्वी शॉ

समाजमाध्यमांवरून उत्साही पृथ्वीवर टीका
आसामविरुद्धच्या पुनरागमनाच्या सामन्यात अर्धशतक केल्यावर बॅट उंचावल्याचा, अर्धशतकाचा आनंद व्यक्त केल्याचा पृथ्वीचा व्हिडीओ भारतीय क्रिकेट मंडळाने ट्‌विट केला. त्यात पृथ्वी बॅटला हात लावून पन्नास धावा केल्याचे सांगत आहे. त्यावर समाजमाध्यमातून टीका झाली. आसामविरुद्धच्या अर्धशतकाचा काय आनंद व्यक्त करायचा. त्यांनी नम्र होण्याची गरज आहे. अतिआत्मविश्वासू क्रिकेटपटू जास्त वेळ टिकत नाहीत, असे एका चाहत्याने म्हटले, तर एकाने बॅट बोलत असताना अन्य काही करण्याची गरज नसते, असेही सुनावले. पृथ्वीला निष्कारण मोठे केले जाते, त्याला किती ऍटिट्यूड आहे, अशीही टिप्पणी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prithvi says my job is to score runs