न्यूझीलंडविरुद्ध पृथ्वीची तुफान खेळी; 100 चेंडूतच झळकाविले...

वृत्तसंस्था
Sunday, 19 January 2020

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारत अ संघात दाखल झालेल्या पृथ्वीने तुफान खेळी करत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.

मुंबई : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतीतून पूर्णपणे सावरत न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यापूर्वी आपला नाणे खणखणीत वाजविले असून, न्यूझीलंड इलेव्हन संघाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने अवघ्या 100 चेंडूत दीडशतक झळकाविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारत अ संघात दाखल झालेल्या पृथ्वीने तुफान खेळी करत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. रणजी करंडक स्पर्धेत कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन त्याने तंदुरुस्तीवर भर दिला. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारत अ संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन चार दिवसांचे सामने खेळणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात पृथ्वीने सलामीला उतरत 100 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 150 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताने 372 धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वीने ऑक्‍टोबर 2018मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, दुखापत आणि उत्तेजक सेवन चाचणीत दोषी ठरल्यामुळे घालण्यात आलेल्या बंदीमुळे तो आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळला आहे. 

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात दोन कसोटी सामने खेळणार आहे. यातील पहिली कसोटी 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघ आज निवडला जाणार आहे. पृथ्वीने पहिल्या रणजी सामन्यात 202 आणि 66 धावा केल्या होत्या. नऊ महिन्यांची बंदी संपवून परतल्यापासून तो चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे पृथ्वीच्या पुनरागमनामुळे कसोटी संघ निवडताना त्याचाही विचार केला जाऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithvi Shaw shines in his comeback match for India A against New Zealand XI