Pro Kabaddi 2019 : प्रो कबड्डीचा नवा अवतार आजपासून 

Pro Kabaddi 2019 : प्रो कबड्डीचा नवा अवतार आजपासून 

प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार संपून काही दिवस होत नाहीत तोच भारतीय क्रीडाप्रेमींना उद्यापासून प्रो कबड्डीची मेजवानी मिळणार आहे. कर्णधारांत आशियाई विजेता इराण ताकद दाखवत असताना सर्व संघांची मदार आता नवोदित खेळाडूंवर असणार हे निश्‍चित झाले आहे. 

यंदाचा हा सातवा मोसम आहे. गतस्पर्धेपासून प्रो कबड्डीची पिढी बदलली. कॅप्टन कूल अनुप कुमार निवृत्त होत असताना सिद्धार्थ देसाई, नितेश कुमार अशा प्रथमच खेळणाऱ्या खेळाडूंचा उदय झाला. अनेक नवे खेळाडू चमक दाखवू लागले. त्यामुळे यंदा अजय ठाकूर, राहुल चौधरी असे जुने खेळाडू असले तरी नवी पिढी त्यांच्याशी पंगा घेण्यास सज्ज झाली आहे. 
उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आज सर्व कर्णधार आणि प्रशिक्षक आमने सामने आले. यात यू मुम्बाचा फझल अत्राचली आणि तेलगू टायटन्सचा अबोझर हे इराणचे खेळाडू कर्णधार होते; तर 40 वर्षीय चेरलाथन हरियानाचा आणि 20 वर्षीय नितेश कुमार युपी योद्धाचा कर्णधार होता. सीनियर-ज्युनियर नेतृत्वाची ही फळी असली तरी प्रत्येक संघाची नवोदितांवरच आशा आहे. 

एकवेळचे भारताचे आणि प्रो कबड्डीतीलही कर्णधार अनुप कुमार आणि राकेश कुमार आता प्रशिक्षकांच्या भूमिकेत असणार आहेत, त्यामुळे मैदानाबरोबर मैदानाबाहेरही कबड्डीची पिढी बदलल्याचे चित्र आज स्पर्धेचे बिगुल वाजण्यापूर्वी दिसले. 

महाराष्ट्राचा कर्णधार नाही 
गतवर्षी महाराष्ट्राचे गिरीश इरनाक पुण्याचा, तर रिशांक देवाडिगा यूपी संघाचा कर्णधार होते. यंदा मात्र महाराष्ट्राचा एकही खेळाडू कर्णधार नसेल. गिरीशऐवजी सुरजित, तर रिशांकऐवजी नितेश कुमार नेतृत्व करणार आहेत. 

सिद्धार्थ देसाईवर लक्ष 
प्रो कबड्डीतील बाहुबली म्हणून आपल्या पहिल्याच मोसमात ओळख निर्माण करणारा महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई गत मोसमात यू मुम्बा संघातून खेळला होता. यंदा त्याला एक कोटी 45 लाखांची किंमत देत तेलगूने घेतले. संपूर्ण स्पर्धेत यंदा तो कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असलेच; परंतु उद्या सलामीच्या सामन्यात त्याच्यासमोर मुंबईचेच आव्हान असेल. सिद्धार्थ आमचा खेळ जाणतो. आम्हीही त्याचा खेळ जाणतो, त्यामुळे हा सामना रंगतदार असेल, असे मुंबईचा कर्णधार फझलने सांगितले. 

गतविजेते वि. प्रदीप नरवाल 
सलग तीनदा विजेतेपद मिळवलेले पाटणा गतस्पर्धेत साखळीतच बाद झाले होते आणि सुपरस्टार कामगिरी करणाऱ्या पवन कुमारमुळे बंगळूरने विजेतेपद मिळवले होते. उद्या दुसरा सामना याच संघात होणार आहे. 

फॉरमॅट बदल फायद्याचा 
विभाग पद्धत रद्द करून यंदा सर्व संघ एकमेकांशी दोनदा खेळणार आहेत, त्यामुळे घरच्या मैदानावर सलग सामने खेळण्याचा ताण खेळाडूंवर येणार नाही, हे फायद्याचे आहे. मात्र, सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 

 गतवर्षी साखळीतच गारद झालो होतो, पुन्हा चॅंपियन होऊन दाखवू. 
- प्रदीप नरवाल, पाटणा कर्णधार 

राहुल चौधरी आणि मी प्रो कबड्डीत प्रथमच खेळणार आहोत, एकमेकांना साथ देऊन मोठी भरारी घेऊ. 
- अजय ठाकूर, तमिळचा कर्णधार 

आमचा संघ सीनियर-ज्युनियर खेळाडूंचे मिश्रण आहे. सराव कसून केला आहे. 
- सुरजित, पुण्याचा कर्णधार 

सर्व संघ तुल्यबळ आहेत, तरीही गुजरात आणि तमिळ थलैवा हे बलाढ्य संघ वाटत आहेत. 
- रोहित कुमार, बंगळूरचा कर्णधार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com