सचिनची आता प्रो-कबड्डीत चढाई?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - प्रो-कबड्डीची लोकप्रियता वाढत असून, या लीगमधील संघ पाचव्या मोसमापासून आठऐवजी बारा करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे; तर सचिन तेंडुलकरसारख्या अनेक स्टार सेलिब्रिटीजनी हे संघ खरेदी करण्याची तयारी दाखवल्याचे समजते. त्याचबरोबर या लीगमधील लढती रोज न खेळवता आठवड्याच्या उत्तरार्धात खेळवण्याचा विचार निश्‍चित झाला आहे.

मुंबई - प्रो-कबड्डीची लोकप्रियता वाढत असून, या लीगमधील संघ पाचव्या मोसमापासून आठऐवजी बारा करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे; तर सचिन तेंडुलकरसारख्या अनेक स्टार सेलिब्रिटीजनी हे संघ खरेदी करण्याची तयारी दाखवल्याचे समजते. त्याचबरोबर या लीगमधील लढती रोज न खेळवता आठवड्याच्या उत्तरार्धात खेळवण्याचा विचार निश्‍चित झाला आहे.

प्रो-कबड्डीची लोकप्रियता काही वर्षांत वेगाने वाढली आहे. कबड्डी हा भारतातील आघाडीचा खेळ झाला आहे. प्रो-कबड्डी लीगच्या कालावधीत याची चर्चा टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत असते, असे या लीगची मालकी असलेल्या स्टार स्पोर्टस्‌चे अधिकारी सांगतात. त्याचबरोबर या लीगच्या प्रेक्षकसंख्येत पहिल्या मोसमाच्या तुलनेत ५१ टक्के वाढ झाली आहे, असे आकडेवारी सांगते. प्रो-कबड्डीची प्रगती पाहिल्यास त्याचा प्रसार वेगाने करण्याची गरज असल्याचे हे अधिकारी सांगतात.

या लीगमध्ये नव्याने संघ येणार, हे कळताच अनेक सेलिब्रिटींनी हे संघ विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. काही कार्पोरेटस्‌ही या संघांच्या खरेदीसाठी उत्सुक आहेत, संघांच्या खरेदीसाठी कोणीही अर्ज करू नये, यासाठी फ्रॅंचाईज शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सचिन तेंडुलकर; तसेच अन्य लीगमधील प्रथितयश फ्रॅंचाईज प्रमुख या लीगमध्ये येण्यास उत्सुक आहेत का, या प्रश्‍नास सूत्रांनी खुल्या निविदाद्वारे फ्रॅंचाईज प्रमुखांची निवड केली जाईल, असे सांगितले.

माझ्यासारख्या कमालीच्या आशावादी व्यक्तीस कबड्डीच्या जोरदार प्रतिसादाने धक्का दिला. प्रो-कबड्डीस वाढते प्रेम लाभत आहे. या लीगचा विस्तार केला नाही तर तो खेळावर अन्याय होईल.

- उदय शंकर, ‘स्टार इंडिया’चे चेअरमन तसेच सीईओ.

प्रो-कबड्डीची वाढती व्याप्ती
 पाचव्या मोसमापासून चार नवे संघ
 तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियानातून संघांसाठी निविदा
 हरियाना आणि तमिळनाडूतील खेळाडू मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या दोन राज्यांना पसंती.
 चेन्नई, अहमदाबाद, चंडीगड आणि लखनौ संघ असण्याची शक्‍यता.
 नवा मोसम तेरा आठवड्यांचा; एकंदर १३५ सामने अपेक्षित.
 दुहेरी साखळी पद्धतीने प्राथमिक स्पर्धा.
 प्रत्येक संघाच्या एकंदर २२ लढती.
 एकंदर १३२ साखळी लढती.
 उपांत्य फेरीच्या दोन; तसेच अंतिम फेरीची एक लढत.
 पूर्वीच्या मोसमाप्रमाणे सलग स्पर्धा होण्याऐवजी त्यात ब्रेक असणार.

Web Title: pro kabaddi