चंदगडचा सिद्धार्थ सर्वांत महागडा

मंगळवार, 9 एप्रिल 2019

मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले.

मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले.

येत्या सातव्या मोसमासाठी प्रो-कबड्डीचा दोन दिवसांचा लिलाव आजपासून सुरू झाला. परदेशी आणि देशातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी आज बोली लागली. गतवर्षी फझल अत्राचली या परदेशी खेळाडूंसह सहा खेळाडूंना कोटींची रक्कम मिळाली होती. यंदा सिद्धार्थ देसाई आणि नितीन तोमर (१.२० कोटी) हेच करोडपती ठरले.

गतवर्षी यू मुम्बाकडून खेळणारा सिद्धार्थ स्टार चढाईपटू ठरला होता. यंदा संघात कायम राहण्यापेक्षा लिलावात येणे त्याने पसंद केले. आजच्या लिलावात त्याच्यावरच सर्वांचे लक्ष होते. ३० लाखांच्या पायाभूत किमतींवरून त्याचे नाव पुकारण्यात आले तेव्हा तेलगूने थेट एक कोटीची बोली लावली, त्यासाठी पुण्यानेही प्रयत्न केले, अखेर तेलगूने बाजी मारली. 

रिशांकला सर्वांत कमी किंमत
गतवर्षी यूपी योद्धाचा कर्णधार असलेल्या रिशांकला एक कोटी एक लाख मिळाले होते. यंदा त्याला ६१ लाखांचीच किमत मिळाली. यूपीने ट्रम कार्ड (बोली लागणाऱ्या किमतीत कायम ठेवणे) लावून आपल्या संघात कायम ठेवले. 

बचावाला कमी प्राधान्य
लिलावात पुन्हा एकदा चढाईपटूंना अधिक भाव देण्यावर भर राहिला. बचाव खेळाडूंत महेंद्र सिंगला सर्वाधिक ८० लाख बंगळूरने दिले, तर दोन अष्टपैलू खेळाडूंत यू मुम्बा 
संघाने संदीप नरवालसाठी ८९ लाख मोजले.
 

अव्वल श्रेणीचे खेळाडू
अष्टपैलू ः रण सिंग ः ५५ लाख तमिळ थलैवा, संदीप नरवाल ः ८९ लाख यू मुम्बा 
पकड ः रविंदर पहल ः ६१ लाख, दिल्ली, सुरेंद्र नाडा ः ७७ लाख पाटणा, गिरीश इरनाक ः ३३ लाख (पुणे), सुरजित ः ५६ लाख पुणे, जयदीप ः ३५ लाख (पाटणा), महेंद्र सिंग ः ८० लाख (बंगळूर), परवेश बैसनवाल ः ७५  लाख (गुजरात), विशाल भारद्वाज ः ६० लाख (तेलगू), अमित हुडा ः ५३ (जयपूर). 
चढाई ः चंद्रन रणजीत ः ७० लाख (दिल्ली), सिद्धार्थ देसाई ः १  कोटी ४५ लाख (तेलगू), नितीन तोमार ः १ कोटी २० लाख (पुणे), मोनू गोयत ः  ९३  लाख (युपी योद्धा), राहुल चौधरी ः  ९४ लाख (तमिळ थलैवा), रिशांक देवाडिगा ः ६१ लाख (युपी), प्रशांत कुमार राय ः ७७ लाख (हरियाना), श्रीकांत जाधव ः ६८  लाख (यूपी योद्धा). 

इराणचा नबिबक्ष परदेशी खेळाडूंमध्ये महागडा
परदेशी खेळाडूंत इराणचा अष्टपैलू महंमद नबिबक्ष याला सर्वाधिक ७७.७५ लाखांची बोली लागली. बंगाल संघाने त्याची बोली जिंकली. नबिबक्ष प्रो-कबड्डीत प्रथमच खेळणार आहे. दुबईत झालेल्या मास्टर्स कबड्डी स्पर्धेत त्याने चमक दाखवली होती. इराणच्या अबोझरसाठीही चांगली स्पर्धा झाली. त्याच्यासाठी ७५ लाख मोजून तेलगूने आपल्या संघात कायम ठेवले.

मी शेतकरी कुटुंबातील असल्याने कबड्डीसाठी आहारावर किती खर्च होतो, हे मला माहिती आहे, त्यामुळे काही रक्कम मी गावातील, तालुक्‍यातील गरीब खेळाडूंसाठी खर्च करणार आहे. एवढी रक्कम मी अपेक्षित केली नव्हती, एवढी बोली लागल्यावर मी नाचायलाच लागलो आहे.
- सिद्धार्थ देसाई