मध्यंतराची पिछाडीच महागात पडली - रणधीर

मध्यंतराची पिछाडीच महागात पडली - रणधीर

पुणे - बाद फेरीसाठी पात्र ठरण्याचे उद्दिष्ट बाळगले असताना ही दुसरी हार निराश करणारी आहे. उत्तरार्धात आम्ही जरूर लढलो; पण उत्तरार्धातील मोठी पिछाडीच आम्हाला महागात पडली, अशी प्रतिक्रिया बंगळूर संघाचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी व्यक्त केली.

घरच्या मैदानांसाठी पुण्याला पसंती दिल्यानंतर बंगळूरने येथे चांगल्या यशाची अपेक्षा बाळगली होती. मात्र, अन्य संघांप्रमाणेच त्यांनाही घरच्या मैदानावर सलग सहा सामने खेळण्याचा त्रास जाणवत आहे. तीन सामन्यांत त्यांनी दुसरा सामना हरला आहे. बाद फेरी निश्‍चित करण्यासाठी त्यांना या टप्प्यात किमान चार विजय अपेक्षित आहेत.

रणधीर सिंग म्हणाले, अजून सामने शिल्लक असले, तरी बाद फेरी निश्‍चित करण्यासाठी आम्हाला येथे चारतरी सामने जिंकावे लागतील. अजून तीन सामने आहेत. हे तीनही सामने आम्हाला जिंकावे लागतील. आज पूर्वार्धातच आम्ही गडबडलो. आमचा खेळच होऊ शकला नाही. बचावात तर अपयश आलेच. त्याचबरोबर रोहितखेरीज दुसरा चढाईपटू चालू शकला नाही. उत्तरार्धात मात्र आम्ही सगळी कसर भरून काढली. विश्रांतीला खेळाडूंची कानउघाडणी केल्यानंतर त्यांनी दाखवलेला खेळ नक्कीच समाधान देणारा होता.’

मध्यांतराला स्वीकारावी लागलेली मोठी पिछाडीच निर्णयाला कारणीभूत असली, तरी दुसऱ्या डावातील अखेरच्या पाच मिनिटांचा खेळ सामन्याचे चित्र पालटवू शकत होता, असे सांगून रणधीर सिंग दुसऱ्या सत्रात रोहितला बचावात चांगली साथ मिळाली. आम्ही पाटणावर लोण देण्यापर्यंत येऊन पोहोचलो होतो. अखेरची पाच मिनिटे असताना ही स्थिती होती; मात्र आम्हाला अपयश आले. पाटणाने चार वेळा लोण परतवून लावला. आम्ही अखेरच्या सेकंदाला दिलेला लोण पाच मिनिटे बाकी असताना आला असता, तर सामन्याचे चित्र बदलू शकले असते.

प्रदीपला सूर गवसला हे चांगलेच आहे; पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाहीये हेदेखील सत्य आहे. अर्थात, ही उणीव दूर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आमचा बचाव किती भक्कम राहतो यावर खूप काही अवलंबून असेल.
- राम मेहेर सिंग, पाटणा पायरट्‌स प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com