पवन शेरावतचा धमाका; बंगळूर बुल्सला प्रथमच विजेतेपद

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जानेवारी 2019

गतवर्षी विजेत्या पाटणाचा प्रदीप नरवाल गुजरातला भारी पडला होता. यावेळी पवनचा वेग गुजरातचे आव्हान धुळीस मिळवणारा ठरला. मध्यांतराची 9-16 पिछाडी, त्यानंतर 16-21 अशी पीछेहाट असताना पवनचे तुफान धडकले. त्याने प्रत्येक चढायांमध्ये गुण मिळवण्यास सुरुवात केली आणि बघता बघता सामन्याला कलाटणी मिळाली. बंगळूरचा हुकमी खेळाडू रोहित कुमार अवघा एकच गुण मिळवू शकला, तरी एकटा खेळाडू अख्ख्या गुजरातवर भारी ठरू शकतो, हेच या अंतिम सामन्याचे चित्र होते.

मुंबई : संघाचे 38 पैकी 22 गुण एकट्याने मिळवणाऱ्या पवन शेरावतच्या तुफानी चढायांमुळे बंगळूरने गुजरातचा 38-33 असा पराभव करून प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमाचे अजिंक्‍यपद मिळवले. गुजरातला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

गतवर्षी विजेत्या पाटणाचा प्रदीप नरवाल गुजरातला भारी पडला होता. यावेळी पवनचा वेग गुजरातचे आव्हान धुळीस मिळवणारा ठरला. मध्यांतराची 9-16 पिछाडी, त्यानंतर 16-21 अशी पीछेहाट असताना पवनचे तुफान धडकले. त्याने प्रत्येक चढायांमध्ये गुण मिळवण्यास सुरुवात केली आणि बघता बघता सामन्याला कलाटणी मिळाली. बंगळूरचा हुकमी खेळाडू रोहित कुमार अवघा एकच गुण मिळवू शकला, तरी एकटा खेळाडू अख्ख्या गुजरातवर भारी ठरू शकतो, हेच या अंतिम सामन्याचे चित्र होते. या स्पर्धेत पवनने सर्वाधिक 260 गुणांची कमाई केली. तोच स्पर्धेचा हिरो ठरला. पुण्यातील टप्प्यात "सकाळ' बंगळूर बुल्सचे मीडिया पार्टनर होते. 

गुजरातचा हुकमी चढाईपटू सचिन तन्वरची पकड करून बंगळूरने यशस्वी सुरुवात केली खरी, परंतु त्यांचा कॅप्टन कूल रोहित कुमार तिसऱ्या निर्णायक चढाईत बाद झाला आणि तेथेच त्याची लय हरपली. त्यामुळे चढायांची सर्वच जबाबदारी पवनवर आली. सलग चढाया करताना पवन आपली जबाबदारी पार पाडत होता; परंतु दोन वेळा तोही बाद झाला. तेव्हा बंगळूरचे आक्रमण निष्प्रभ झाले. त्यावेळी बंगळूर बचावाने सचिनला रोखून धरले. त्याच वेळी त्यांचा प्रबंजन गुण मिळवत होता. त्यामुळे सामन्याचा गुणफलक बरोबरीत पुढे जात होता. बंगळूरकडे एकच खेळाडू शिल्लक राहिला. त्यावेळी बदली खेळाडू काशिलिंग अडकेने बोनस आणि एक गुण मिळवला; परंतु त्यांच्यावर लोण पडलाच.

पूर्वार्धात नऊ चढायांत एकही गुण न मिळवलेला रोहित कुमार उत्तरार्धात लगेचच बाद झाला. पवनचीही पकड झाली. त्यामुळे बंगळूर 12-19 असे पिछाडीवर पडले. सामना हातून निसटल्याची जाणीव होऊ लागताच बंगळूरने वेग वाढवला. रोहित अपयशी होत असल्याने पवनने चढायांची सर्व जबाबदारी स्वीकारली. पिछाडी कमी करत नेली आणि एकाच चढाईत दोनदा दोन दोन गुण मिळवले. गुजरातवर लोण दिला आणि संघाला 23-22 अशी आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर बंगळूरने जेतेपदाकडे झेप घेण्यास सुरुवात केली.

Web Title: Pro Kabaddi final Bengaluru Bulls vs Gujarat Fortunegiants Bengaluru beat Gujarat 38-33 to win season six title