गतविजेत्या पटणाचा विजयी चौकार

शैलेश नागवेकर - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जुलै 2016

पटणा - गतवेळेस विजेतेपद मिळवल्यानंतर प्रथमच घरच्या मैदानावर विजेतेवीर म्हणून खेळणाऱ्या पटणा पायरेट्‌सने बंगळूरू बुल्सचा ३१-२५ असा पराभव करून विजयाचा चौकार मारला; परंतु वर्चस्वानंतरही त्यांना अखेरपर्यंत शर्थ करावी लागली. 

पटणा - गतवेळेस विजेतेपद मिळवल्यानंतर प्रथमच घरच्या मैदानावर विजेतेवीर म्हणून खेळणाऱ्या पटणा पायरेट्‌सने बंगळूरू बुल्सचा ३१-२५ असा पराभव करून विजयाचा चौकार मारला; परंतु वर्चस्वानंतरही त्यांना अखेरपर्यंत शर्थ करावी लागली. 

स्टार चढाईपटू प्रदीप नरवाल, राजेश मोंडल यांनी चढाईत हमखास यश मिळवले; परंतु एका क्षणी अडचणीची परिस्थिती असताना केवळ एका चढाईसाठी एकटाच मैदानात आलेल्या इराणच्या अबलफझलने तीन गुण मिळवले. संघावरील लोणचे सावट आणि संभाव्य पराभवाचेही सावट दूर केले. त्याची पकड झाली असती तर बंगळूरूने २३-२१ आघाडी घेतली असती. सलग चौथ्या विजयासह पटणाने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि त्यामुळे मुंबई पाचव्या स्थानी घसरले. आक्रमणात प्रदीपने आठ, मोंडलने सहा, तर कुलदीप सिंगने पकडीत सहा गुणांची कमाई केली.  

गतवर्षी पटणाचा हुकमी चढाईपटू असलेला रोहित कुमार या वेळी बंगळूरूकडे आहे. त्याने चढाई पकडीत नऊ गुणांची कमाई केली खरी; पण निर्णायक क्षणी त्याच्या पकडी करून पटणाने वर्चस्व दाखवले. पहिल्या दोन सर्व्हिसमध्ये खडाखडी झाल्यानंतर दोन्ही संघांच्या गुणांची सुरवात बाद करा किंवा बाद व्हा (डू ऑर डाय) या चढाईवरच झाली. गतवर्षी पटणाच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या राजेश मोंडलने डू ऑर डाय चढाईत हमखास गुण मिळवले. सुरवातीला त्याने मोहित चिल्लरलाच बाद केले. त्यापूर्वी बाजीराव होडगेने बंगळूरूचा हुकमी चढाईपटू रोहित कुमारला टिपले. 

चढाईत सर्वाधिक गुण मिळवत असलेल्या पटणाच्या प्रदीपने कौशल्य दाखवले. त्यामुळे आठव्या मिनिटाला बंगळूरूवर लोण पडण्याची स्थिती होती; पण पवन कुमारने बोनस आणि दोन खेळाडूंना बाद करून चुरस निर्माण केली. 

जीवदान मिळालेल्या रोहितने प्रदीपची सुपर कॅच केली, त्यामुळे बंगळूरूने ८-७ आघाडी घेतली; पण रोहितची पकड करून पटणाने १४ व्या मिनिटाला लोण दिला आणि १२-९ अशी आघाडी घेतली. मध्यांतराच्या १५-१२ अशा आघाडीनंतर पटणाला १० मिनिटानंतरही गुणांमधले अंतर वाढवता आले नव्हते; पण अबलफझलच्या एका चढाईने चित्र बदलले.

Web Title: Pro Kabaddi league (PKL), season 4: Patna Pirates humble Bengaluru Bulls 31-25