पलटणसमोर आज डू ऑर डाय लढत 

शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

संपूर्ण स्पर्धेत पुणे संघाने आपले आव्हान समर्थपणे उभे केले आहे. पण, गुजरातला हरविणे त्यांना जमलेले नाही. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात पुण्याला गुजरातविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. आता उद्या दोन्ही संघांतील आणि स्पर्धेतील अखेरचा सामना खेळताना पुणे संघ गुजरातवर विजय मिळविण्याची आस बाळगून आहे.

पुणे : प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमाचे प्ले-ऑफ संघ निश्‍चित झाले असले, तरी "अ' गटातील संघांच्या क्रमवाराची औपचारिकता अजून बाकी आहे. यात उद्या शुक्रवारी यजमान पुणेरी पलटण संघासमोर गुजरात फॉर्च्युन जायंट्‌स संघाचे आव्हान असेल. हरियानाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतरही गुण फरकावर पुणे संघाने हरियानाला मागे टाकून दुसरा क्रमांक मिळविला आहे. आता पुणे संघासमोर आघाडी मिळविण्यासाठी गुजरातवर विजय अनिवार्य असेल. 

संपूर्ण स्पर्धेत पुणे संघाने आपले आव्हान समर्थपणे उभे केले आहे. पण, गुजरातला हरविणे त्यांना जमलेले नाही. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात पुण्याला गुजरातविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. आता उद्या दोन्ही संघांतील आणि स्पर्धेतील अखेरचा सामना खेळताना पुणे संघ गुजरातवर विजय मिळविण्याची आस बाळगून आहे. घरच्या मैदानावर गेल्या दोन सामन्यांत पुणे संघाने मिळविलेले विजय निश्‍चित त्यांचा आत्मविश्‍वास उंचावणारे ठरतील यात शंका नाही. हरियानाविरुद्ध पुणे संघ डू ऑर डाय चढाईत अडकला होता. आता गटात आघाडीवर येण्यासाठी त्यांना उद्या गुजरातविरुद्ध डू ऑर डाय लढत खेळायची आहे. या सामन्यातील विजय त्यांना आघाडीवर घेऊन जाणार आहे. त्यामुळे पुणे संघाला सर्वच आघाड्यांवर आपला खेळ उंचवावा लागणार आहे. 

पुणे संघाचे प्रशिक्षक रमेश म्हणाले, "हरियानाविरुद्ध हरल्यानंतर एक वेळ आम्ही जरूर निराश झालो होतो. पण, जयपूरविरुद्धच्या विजयाने नक्कीच उभारी घेतली आहे. दीपक तर चांगलाच खेळत आहे. त्याला राजेश मोंडल आणि अक्षय जाधवची साथ मिळत आहे. बचावात आम्ही मागे पडत असल्याचे बोलले जात असले, तरी माझा त्यावर विश्‍वास नाही. गिरीश इरनाक, धर्मराज चेर्लाथन यांची कामगिरी चांगली होत आहे. रिंकू नरवालही आपली योग्यता सिद्ध करत आहे. आम्ही एकेक उद्दिष्ट पार करत इथपर्यंत आलो आहोत. आता विजेतेपद आम्हाला हाक मारत आहे. त्यामुळे उद्याची लढत काही केल्या जिंकून आघाडी पटकाविण्याचे आम्ही उद्दिष्ट बाळगले आहे.'' 
जयपूरविरुद्ध मिळविलेल्या विजयाने कर्णधार दीपक हुडाचादेखील आत्मविश्‍वास उंचावला होता. तो म्हणाला, ""प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा होता. आमचा खेळदेखील चांगला झाला. यशाने कधी साथ केली, तर कधी नाही. अर्थात त्यामुळे आम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याची प्रेरणा मिळाली. जयपूरविरुद्ध तर आमचा प्रत्येक खेळाडू खेळला. आता प्रत्येकालाच आघाडीचे स्थान खुणावत आहे. त्यामुळे आम्ही सर्वस्व पणाला लावून विजय मिळविण्याच्या उद्देशानेच गुजरातविरुद्ध मैदानात उतरू.'' 

पुणे संघ गुजरातवर विजय मिळविण्याची इच्छा बाळगून असला, तरी त्यांना त्यासाठी आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. चढाईत दीपक हुडा एकटात लय बाळगून आहे. मोंडल, अक्षय तसेच संदीप नरवाल यांना आपली योग्यता नव्याने सिद्ध करावी लागणार आहे. त्याचवेळी दुबळा बचाव ही पुण्याची खरी डोकेदुखी आहे. गिरीश इरनाक, धर्मराज चेर्लाथन यांना बचावात फारसे सातत्य दाखवता आलेले नाही. उद्या या दोघांना लय गवसली तर पुणे संघाचे विजयाचे अर्धे काम सोपे होणार आहे. मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेशासाठी एकच लढत खेळायची असेल, तर पुणेरी पलटणला उद्याची "डू ऑर डाय' लढत जिंकावीच लागेल. 

Web Title: pro kabbadi puneri paltan