प्रो कबड्डी जूनपासून; दहा संघांच्या स्पर्धेचा विचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमाची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. नव्या पर्वास जूनच्या उत्तरार्धात सुरवात होण्याची अपेक्षा असून, या वेळी दहा संघांचा समावेश असण्याची शक्‍यता पडताळून पाहण्यात येत आहे. 

मुंबई - प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमाची प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. नव्या पर्वास जूनच्या उत्तरार्धात सुरवात होण्याची अपेक्षा असून, या वेळी दहा संघांचा समावेश असण्याची शक्‍यता पडताळून पाहण्यात येत आहे. 

क्रिकेट लीगशी स्पर्धा करेल, इतका टीव्ही प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रो कबड्डी लीगला लाभत आहे. त्यामुळे या लीगचा कालावधी वाढवण्याचा विचार सुरू आहे. चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जूनला संपणार आहे. त्यानंतर लगेचच काही दिवसांत प्रो कबड्डी लीगला सुरवात होईल, असे सूत्रांनी सांगितले. या लीगबाबत कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही; पण या वेळी होणाऱ्या लीगचे स्वरूप इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या धर्तीवर असेल, असे सांगण्यात येत आहे.

अधिक लढती 

गतवर्षी लीग संपतानाच रोज लढती घेण्याऐवजी वीकेण्डला जास्त लढती खेळवण्याचा विचार पुढे आला होता. त्याचा प्रयोग विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेत करण्यात आला होता. त्यामुळे आता या लीगच्या लढती बुधवार (किंवा गुरुवार) ते रविवार खेळवण्यात येतील. शनिवार, रविवारी तीन लढती होतील, असा प्राथमिक विचार आहे, असे सांगितले जात आहे. त्याच वेळी आठवड्यातील पहिल्या तीन दिवसांत सार्वजनिक सुटी असल्यास त्या दिवशी सामने घेण्याचा विचार सुरू आहे. 

चेन्नई, अहमदाबादची आघाडी
कबड्डी लीगमधील संघ वाढवण्याचा विचार जवळपास अंतिम झाला आहे. सध्या या शर्यतीत चेन्नई व अहमदाबाद आघाडीवर आहेत. त्याच वेळी मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशातील एक संघ असावा. त्याचबरोबर उत्तर-पूर्व राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गुवाहाटीचा संघ असण्यासाठीही आग्रह होत आहे. अद्याप काहीही अंतिम नाही. सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे कबड्डी पदाधिकारी सांगत आहेत. संघाची निवड करताना बंदिस्त स्टेडियमची अट महत्त्वाची आहे. अहमदाबादमध्ये विश्‍वकरंडक कबड्डी झाल्यामुळे या शहराचे नाव निश्‍चित झाल्याचे समजते.

पाकमधील लीग अधांतरी
भारतातील विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेपासून दूर ठेवल्यानंतर पाकिस्तान कबड्डी महासंघाने मार्चमध्ये लीग घेण्याची घोषणा केली; मात्र या लीगबाबत अनिश्‍चितता असल्याचे वृत्त पाकमधील माध्यमांनी दिले आहे. देशातील परिस्थिती स्पर्धेसाठी पोषक होण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे काही पदाधिकारी सांगतात, तर काहींनी स्पर्धा लांबणीवर पडल्याचे सांगितले. लीगबाबत माहितीच दिली नाही, तर तिच्याबाबत चर्चा कशी होणार, अशी विचारणा केल्यावर त्यासाठी पुरेसा वेळ असेल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ही लीग सध्या तरी स्थानिक खेळाडूतच घेण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: pro kabddi start june