व्यावसायिक टेनिसपटू कमी करण्याचा निर्णय

पीटीआय
शनिवार, 1 एप्रिल 2017

लंडन - आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) स्पर्धा स्वरूपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जगात १४ हजार व्यावसायिक टेनिसपटू आहेत; पण आता ही संख्या १५०० वर आणण्याचा निर्णय झाला आहे. 

लंडन - आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) स्पर्धा स्वरूपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जगात १४ हजार व्यावसायिक टेनिसपटू आहेत; पण आता ही संख्या १५०० वर आणण्याचा निर्णय झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ तीन वर्षे जगभरातील स्पर्धांचा आढावा घेत आहे. त्यानुसार, अनेक टेनिस खेळाडूंना ते व्यावसायिक असले, तरी त्यातील उत्पन्नावर अवलंबून राहता येत नाही, असे लक्षात आले. १४ हजारांपैकी सात हजार खेळाडू वर्षभरात काहीही बक्षीस रक्कम जिंकत नाहीत. त्यामुळेच आता ७५० पुरुष आणि ७५० महिला एवढेच व्यावसायिक टेनिसपटू राहतील, असा निर्णय झाला आहे. याची अंमलबजावणी २०१९ पासून होईल. तेव्हापासून स्पर्धांचे स्वरूपही बदलणार आहे.

आयटीएफ व्यावसायिक मालिकेतील कमी बक्षीस रकमेच्या स्पर्धात खेळाडू आयटीएफ प्रवेश गुण मिळवतील. सध्या सर्व स्पर्धांत एटीपी (पुरुषांसाठी) अथवा डब्ल्यूटीए (महिलांसाठी) मानांकन गुण दिले जातात. अर्थातच, आयटीएफ प्रवेश गुण; तसेच एटीपी व डब्ल्यूटीए गुणांची सांगड घातली जाईल. त्यामुळे चांगल्या खेळाडूंचे नुकसानही होणार नाही.

आयटीएफ प्रवेश गुण देणाऱ्या स्पर्धा प्रामुख्याने स्थानिक स्वरूपाच्या असतील. त्यामुळे खेळाडूंचा प्रवास; तसेच अन्य खर्चही कमी होईल. त्याचबरोबर स्पर्धा संयोजकांवरील ताणही कमी होईल. भविष्यात आयटीएफ स्पर्धातून नोकरीच्या संधीही निर्माण होतील. सच्चे व्यावसायिक टेनिसपटूही घडतील, असा विचार असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Professional tennis player