पुणेकर कुटुंबांचे लक्ष्य ९/१२

डॉ. आदित्य-रिया-सानिया-डॉ. जाई धावण्याचा सराव करताना.
डॉ. आदित्य-रिया-सानिया-डॉ. जाई धावण्याचा सराव करताना.

पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत.

मॅरेथॉनही पाहावी धावून! - डॉ. जाई केळकर
मी शाळेत असताना जिम्नॅस्टिक्‍स केले. ॲथलेटिक्‍समध्ये लांब उडी करायचे. १०० मीटर स्प्रिंटला माझी वेळ १४ सेकंद होती. शालेय पातळीवरील सात-आठ मेडल्स माझ्याकडे आहेत. तायक्वोंदोमध्ये मी रेड बेल्ट मिळविला आहे. एकूण व्यायमात सातत्य राहिले आहे. धावायला सुरवात गेल्या पाच वर्षांपासून आणि आयर्नमॅन कौस्तुभ राडकरच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध ट्रेनिंग पावणेदोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मी आणि आदित्यने बंगळूर मॅरेथॉन साडेपाच तासांत पूर्ण केली. मॅरेथॉन ही एक अनुभूती असते. आपण म्हणतो ना की घर पाहावं बांधून. त्याच धर्तीवर मला म्हणावेसे वाटते की मॅरेथॉनही पाहावी धावून! तुम्ही टप्प्याटप्प्याने सुरवात करता. तुम्हाला तुमच्या मर्यादा-क्षमता कळतात.

नऊ डिसेंबरला आम्ही दोघे हाफ मॅरेथॉन, तर सानिया-रिया सहा किमी शर्यतींत धावतील. त्या दोघी जिम्नॅस्टिक्‍स करतात. धाकटी रिया दहा किमी शर्यत तीन वेळा, तर सानिया एकदा धावली आहे. 

धावण्याने वाढली व्यायामाची गोडी - डॉ. आदित्य केळकर
मी मल्लखांब करायचो. मला श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही मिळाला आहे. २०१५ मध्ये माझे काही मित्र मॅरेथॉन धावायला लागले. त्यांना पाहून मी आणि जाईने थेट हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. मी १३ किलोमीटरच्या टप्प्याला दमलो, तेव्हा जाईचा स्टॅमिना चांगला होता. तिच्या प्रोत्साहनामुळे मी धावत राहिलो. तिला साधारण १८-१९ किमीला दमल्यासारखे झाले, तरीही आम्ही दोघांनी २१ किमी अंतर जिद्दीने पार केले, पण नंतर त्रास झाला. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, की आम्ही डॉक्‍टर असून धोका का पत्करला, तर त्याचे उत्तर असे आहे, की मॅरेथॉनचा माहोलच काही और असतो. त्यामुळे आम्ही दमलो ही एक बाजू झाली, तर दुसरी बाजू म्हणजे आम्ही दोन तास ४० मिनिटे धावलो.

या त्रासदायक अनुभवानंतर मात्र आम्ही नियमित व्यायाम करू लागलो. तसा मी पूर्वीपासून काही तरी फिटनेस करायचो; पण त्यात सातत्य नव्हते. मॅरेथॉनची गोडी लागल्यामुळे व्यायामाची गोडी वाढली. आता दोन तास १३ मिनिटांपर्यंत आम्ही हाफ मॅरेथॉन धावतो.

आजारपणाचे लक्षण डोळ्यात दिसते. आपण म्हणतो ना की अरे तुझे डोळे असे का दिसतायत...डोळे तेजस्वी दिसत असतील तर ती व्यक्ती तंदुरुस्त आहे असे समजावे. डॉक्‍टर या नात्याने लहान मुलांमध्ये स्थौल्य (ओबेसिटी), तर तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे.

मी जवळपास दिवसभर पेशंट तपासतो. धावण्यासाठी सकाळी वेळ काढला की मग दिवस पूर्ण मिळतो, काम सोडण्याची गरज नसते. आमच्या रनिंग कम्युनिटीमध्ये स्पर्धा नसते. माझी रन चांगली व्हावी- तुझी रन चांगली व्हावी, असेच प्रत्येकाला वाटते. त्यामुळे तुम्हाला धावणारे मित्र-मैत्रिणी मिळतात. 

बदलत्या जीवनशैलीत विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल आला आणि ते मान खाली घालून अनेक तास एका ठिकाणी बसू लागले. त्यांना दिवसाचा काही वेळ तरी या गॅजेट्‌सपासून लांब ठेवणे आणि व्यायामाच्या जवळ आणणे आवश्‍यक बनले आहे. सूर्यनमस्कार, पळणे यांसारख्या सोप्या व्यायामप्रकारांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवता येते. म्हणूनच मॅरेथॉनसारख्या स्पर्धांची गरज आहे. त्यात आमच्या महाविद्यालयाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेऊन मी स्वतःही सहभागी होईन.
- दिलीप शेठ, प्राचार्य, स. प. महाविद्यालय

धावणे हा एरोबिक व्यायाम आहे. यामुळे चयापचयक्रियेवर चांगला परिणाम होतो. ग्रहण केलेल्या अन्नाचा वापर करण्याची क्षमता वाढते. पचनक्रिया, लिव्हर, स्नायू तसेच मेंदूवरदेखील याचा चांगला परिणाम होत असतो. धावण्यामुळे गुडघ्यांना त्रास होतो, असा एक गैरसमज प्रचलित आहे; परंतु असे काही होत नाही. धावण्याचे योग्य नियम पाळले की, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. यामुळे फायदाच होतो. 
- डॉ. संजय गुप्ते, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक ॲण्ड गायनाकॉलॉजी सोसायटीज ऑफ इंडिया

खेळाडू सोडा, प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असेल, तर आधी धावलेच पाहिजे. संतुलित शरीरयष्टी राखण्यासाठी धावणे हा परिपूर्ण व्यायाय आहे. मुख्य म्हणजे धावण्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड, शुगर आणि पल्स रेटवर नियंत्रण राहते. खेळाडूच्या आयुष्यात तर धावणे हे जोडलेलेच असते. रोजचा सराव असतो तेव्हा स्पीड वर्क केले जाते आणि ऑफ सिझनला आम्ही लाँग रन घेत असतो. त्यामुळे आमचे शरीर संतुलित राहते. खरे तर धावण्याशिवाय कुठलाच व्यायाम प्रकार पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आधी धावलेच पाहिजे. खेळाडू असलो, तरी कधी कधी आमच्याकडून राहून जाते. पण, सध्या धावण्याबाबत आयोजित होणाऱ्या अशा उपक्रमातून जागरूकता झाल्यामुळे सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक धावताना दिसून येतात आणि तेच मग आमचे प्रेरणास्थान ठरतात. मॅरेथॉन किंवा दौड असे उपक्रम साजरे होत असताना त्यासाठी वयोगटाचे बंधन नसावे, ते खुले असावे, असे वाटते. 
- दीपिका जोसेफ, आशियाई सुवर्णपदक विजेती कबड्डीपटू

पुणेकरांनो, धावा आणि टॅग करा!
सकाळ माध्यम प्रायोजक असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील सर्व गटांच्या शर्यतींना नावनोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ९ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. 
तुम्हीही आजच नोंदणी करा. 
तुमचे अनुभव, फोटो, व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करा. त्यासाठी सकाळ स्पोर्टसचे व्यासपीठही उपलब्ध आहे.

फेसबुकवर @sakalsports ला टॅग करा #Phd वापरा
www.facebook.com/mysakalsports

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com