9/12 सुदृढ आरोग्याचा प्रारंभ

9/12 सुदृढ आरोग्याचा प्रारंभ

पुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत. केवळ मॅरेथॉनसाठीच नव्हे, तर त्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली कायम राहावी या उद्देशाने ९ डिसेंबर ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूह करीत आहे. 

मॅरेथॉननंतर वर्षभर ‘सकाळ’ आरोग्याच्यादृष्टीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेऊन येत आहे. त्यामुळे, ९ डिसेंबरचा ‘पुणे हेल्थ डे’ म्हणजे आरोग्यसंपन्न आयुष्याच्या दिशेने पहिले सक्रिय पाऊल ठरणार आहे. 

पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मध्ये मीडिया पार्टनर म्हणून ‘सकाळ’ सहभागी होत आहे. नामवंत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय धावपटूंचा सहभाग निश्‍चित झालेल्या हाफ मॅरेथॉनमधील फॅमिली रनमध्ये सहभागी होऊन पुणेकरांनी आरोग्यसंपन्न जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहन ‘सकाळ’ करीत आहे. 

मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे आहेतच; त्याशिवाय आजच्या स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी सुदृढ आरोग्याची गुरुकिल्लीही पुणेकरांना मिळणार आहे. 

धावण्यासाठी आपली मानसिकताच नव्हे, तर आनुवंशिकता अनुकूल नाही इथपासून अनेक समज-गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहेत. ते नष्ट व्हावेत म्हणून धावण्याच्या शास्त्राचे जनक डॉ. जॅक डॅनिएल्स यांना निमंत्रित केले असून, त्यांच्या संकल्पनेतील ट्रेनिंग प्रोग्रॅम २१ व १० किमी शर्यतीसाठी नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला मिळेल.

पहिल्या उपक्रमासाठी आपण फॅमिली रनने सुरवात करू शकता आणि त्यानंतर आपली पावले जास्त अंतराच्या शर्यती पूर्ण करण्याच्या दिशेने टाकू शकता. आपण सकाळी हा मजकूर वाचत असतानाच कदाचित तुमच्या सोसायटीत राहणारी मंडळी तिकडे जॉगिंग ट्रॅकवर ॲक्‍शन करीत आहेत. 

त्यांनी वैचारिक संकल्प शारीरिक कृतीत नेला आहे. अशी काही प्रेरणादायी उदाहरणे आम्ही आज आपल्यासमोर मांडत आहोत. तुम्ही सुद्धा त्यांच्या पंक्तीत विराजमान होऊ शकता.

एरवी आपण ‘सेलिब्रेशन’चे निमित्त शोधत असतो, ‘आउटिंग’चे प्लॅन बनवीत असतो. शारीरिक तंदुरुस्तीच्या आघाडीवर मात्र असे नियोजन क्वचित होते. पुण्यात रनिंगचे काही क्‍लब एकत्र आले आहेत आणि त्यांचे उपक्रम धडाडीने पार पाडत आहेत. यास व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘पुणे हेल्थ डे’ हे दिशादर्शक पाऊल ठरेल. पुढे जाऊन हा दिवस प्रत्येक पुणेकराच्या जीवनात ‘माइल स्टोन’ ठरेल.

धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य सुदृढ राखण्यासाठी ९ डिसेंबर रोजी पुणे आरोग्य दिन (पुणे हेल्थ डे) साजरा करण्याचे आवाहन  सकाळ माध्यम समूह पुणेकरांना करीत आहे. 

पुणे ही क्रीडानगरी आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, याला नेहमीच आम्ही प्राधान्य दिले आहे. हाफ मॅरेथॉन होणे शहराच्यादृष्टीने भूषणावह आहे. यास पुणे महापालिकेचे पूर्ण सहकार्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे. कुटुंबासाठीची ही मॅरेथॉन शहराची शान ठरेल, याबाबत मला पूर्ण विश्‍वास आहे. 
-मुक्ता टिळक, महापौर, पुणे 

सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्य बिघडण्यापूर्वीच ते चांगले राहावे, यासाठी काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. ‘पुणे हेल्थ डे’ उपक्रम त्यासाठी महत्त्वाचा आहे. या आगळ्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावे आणि आपल्या तंदुरुस्तीच्या आघाडीवर सक्रिय व्हावे. आपण आणि आपले कुटुंब आरोग्यदायी राहावे, यासाठी यातील विविध गटांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवा आणि हा उपक्रम यशस्वी ठरवा. यास महापालिका, राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.
-गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे 

खेळाडूसाठी सपोर्ट सिस्टिमची नेहमीच चर्चा होते. यातील पहिला घटक असतो तो कुटुंब. आजही ‘स्पोर्ट्‌स मत करो-स्टडीज पर ध्यान दो’ असा घोषा लावला जातो. अशावेळी या मॅरेथॉनमुळे कुटुंबातील इतर घटक मैदानावर येतील आणि त्यांना खेळाडू कोणत्या परिस्थितीला सामोरे जातो हे कळेल.
- आदिल सुमारीवाला, ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष, माजी ऑलिंपियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com