मी धावणार आहे, तुम्हीही सहभागी व्हा (व्हिडिओ)

Namrata-Patil
Namrata-Patil

पिंपरी - ‘‘आबालवृद्धांनी विशेषतः महिलांनी स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढला पाहिजे. कुटुंबाला आवर्जून पोषक आहार देताना महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. त्यामुळे मी आणि माझी दहावर्षीय मुलगी स्वरा ९ डिसेंबरच्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. तुम्हीदेखील भाग घ्यावा,’’ असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ च्या पोलिस उपायुक्‍त नम्रता पाटील यांनी केले.

‘सकाळ’ माध्यम समूहाने ९ डिसेंबरचा दिवस ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले असून, याच दिवशी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनही होणार आहे. त्यानिमित्त ‘सकाळ’शी बोलताना पाटील यांनी आवाहन केले. 

पाटील म्हणाल्या, ‘‘मुंबईतील माझी शाळा शिरोडकर हायस्कूल मुलींच्या कबड्डीसाठी प्रसिद्ध होती; परंतु मी पुस्तकी किडा असल्याने त्या वाटेला कधी गेले नाही. पोलिस अकादमीत प्रशिक्षणाच्या वेळेस छंद म्हणून बॅडमिंटन, लॉन टेनिस आदी खेळ खेळण्यास सुरवात केली. जुळ्या मुलींच्या जन्मानंतर माझे वजन वाढले. त्यामुळे २०१५ पासून धावण्यास प्रारंभ केला. सर्वप्रथम ठाणे येथील १५ ऑगस्ट २०१५ ला शर्यतीत धावले. त्यासाठी मला पती गणेश पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. पिंपरी-चिंचवडमध्ये ऑगस्ट २०१८ ला पोलिस उपायुक्त म्हणून रुजू झाले. आठवड्यात किमान चार दिवस तरी धावण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्यामुळे दहावर्षीय मुलगी स्वरा हिच्यामध्येही धावण्याची आवड निर्माण झाली असून, तिने लहान गटात विविध मॅरेथॉन यशस्विपणे पूर्ण केल्या आहेत.’’ एमपीएससी परीक्षेत पाटील यांनी २००२ मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक, आयसीडब्ल्यूएमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. मुंबई विद्यापीठाच्या शेअर मार्केट संबंधित ‘सिक्‍युरिटी लॉ’विषयक पदविका परीक्षेतही पहिले स्थान मिळविले आहे. 

...महत्त्वपूर्ण भूमिका 
चिंचवडमधील क्वीन्स टाऊन येथील १२ वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. त्या प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्यानंतर त्यांनी पुणे रनिंग स्पोर्टस फाउंडेशन आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ४० वर्षांखालील महिलांच्या गटात भाग घेत अव्वल स्थान पटकाविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com