पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावले हजारो पुणेकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

आजचा दिवस पुणेकरांसाठी संडे नाही तर हेल्थ डे होता. या मॅरेथॉनमध्ये लहानग्यांपासून महिला, वयोवृद्ध, अपंग अशा सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

पुणे : गेल्या महिन्याभरापासून घेतलेला तंदुरुस्तीचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी हजारो पुणेकर पहाटे चार वाजल्यापासूनच म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत गर्दी करु लागले होते. आजचा दिवस पुणेकरांसाठी संडे नाही तर हेल्थ डे होता. या मॅरेथॉनमध्ये लहानग्यांपासून महिला, वयोवृद्ध, अपंग तसेच परदेशी नागरिक अशा सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

फॅमिली रन या नवीन संकल्पनेतून बजाज आलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये तब्बल 7000 स्पर्धकांनी आपल्या कुटुंबासह सहभाग घेतला होता. 

बजाज आलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन झालेल्या 21 किमी स्पर्धेत पुरुषांच्या गटात उत्तराखंडच्या प्रदीपसिंगने पहिला क्रमांक पटकाविला तर उत्तराखंडच्याच मनसिंगने दुसरा क्रमांक पटकाविला. औरंगाबादच्या प्रल्हाद रामसिंग याने तिसरा क्रमांक पटकाविला. प्रदीपसिंगने केवळ एक तास सहा मिनिटे आणि आठ सेकंदांमध्ये 21 किमी मॅरेथॉन पूर्ण केली. मनसिंग आणि प्रल्हाद यांनी अनुक्रमे एक तास सहा मिनिटे, 37 सेकंद आणि एक तास सहा मिनिटे, 53 सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. हे तिन्ही धावपटू आर्मी स्पोर्टस इन्स्टीट्यूटचे आहेत. 

महिलांच्या गटात मनिषा सांळुखे यांनी एक तास 22 मिनिटे, आठ सेकंदांत स्पर्धा पूर्ण करत पहिला क्रमांक पटकाविला. सिंधू यादव (1:23:03) आणि मोलिका राऊत (1:23:45) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविले. 

बजाज आलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या 10 किमी प्रकारात पुरुषांच्या गटात पिंटूकुमार यादव यांनी 31 मिनिटे 42 सेकंदांत स्पर्धा पूर्ण करत पहिला क्रमांक पटकाविला तर सतीश जय (31:44:00) आणि हेमंत कुमार यादव (31:55:00) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.  शीतल भगत यांनी 37 मिनिटे, 19 सेकंदात स्पर्धा पूर्ण करत महिलांच्या गटात पहिला क्रमांक पटकाविला. 

वेलनेस ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनसाठी मीडिया पार्टनर म्हणून पुढाकार घेताना सकाळ माध्यम समूहाने हा दिवस पुणे हेल्थ डे म्हणून साजरा करण्याची साद घातली होती. स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी होत मॅरेथॉनला अद्भूत प्रतिसाद दिला.

Web Title: Pune half marathon successful