नऊ डिसेंबर रोजी १८ हजार पुणेकर धावणार

Pune-Health-Day
Pune-Health-Day

पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या शर्यतीचे माध्यम प्रयोजक म्हणून पुढाकार घेत ‘सकाळ’ने नऊ डिसेंबर हा ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून सक्रियतेने साजरा करण्याची साद दिली, त्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे.

स्पर्धेचे मुख्य समन्वयक आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर बंगल्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बापट म्हणाले, ‘‘‘पुणेकरांची तंदुरुस्ती’ (वेलनेस) ही संकल्पना या अर्धमॅरेथॉनमधून पुढे आली, त्यामुळेच पुणेकरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
अनेकांना दहा किंवा २१ किलोमीटर धावणे शक्‍य होत नाही. अशावेळी सहा किलोमीटरने ते सुरवात करतील, त्यामुळे ‘फॅमिली रन’ हे खास आकर्षण ठरेल, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ‘महापौर चषक’, पोलिसांसाठी ‘पोलिस कमिशनर कप’ अशी स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी यासाठी पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी, पीएमआरडीए, मेट्रो, पीएमपीएल, भारत पेट्रोलियम, क्रेडाई, क्रीडा विभाग विविध संस्था, शैक्षणिक संस्था आदींनी सहकार्य केले आहे. ही अर्धमॅरेथॉन पुण्याचे वैशिष्ट्य बनावे असा आमचा प्रयत्न आहे.’’ 

बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’चे ‘सीईओ’ विकास सिंग यांनी सांगितले, की ‘पुण्यातील हवामान मॅरेथॉनसाठी आदर्श आहे. शर्यतीचा मार्गही वेगवान आहे. वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यास हे शहर आदर्श आहे. मी अनेकविध शहरांत धावलो आहे, त्यामुळे तुलना केल्यास मला पुणे सर्वोत्तम वाटते.’

पालकमंत्री या नात्याने मी प्रत्येक सकारात्मक उपक्रमास सहकार्य करतो. मी कार्यकर्ता असल्यापासून कबड्डीपासून अनेकविध खेळांचे सामने आयोजित केले आहेत. आमदार चषक स्पर्धेचेही आयोजन होत असते. आता पालकमंत्री झाल्यावरसुद्धा खेळाला प्रोत्साहनाची भूमिका कायम आहे. मी काही मॅरेथॉन शर्यतींना उपस्थित राहिलो आहे. पुण्यात कुणी काही चांगले करीत असेल तर मदत करतो. तुम्ही मंडळी पुढे आलात तर तुम्हालासुद्धा करू. मी खेळात राजकारण आणत नाही. 
- गिरीश बापट, पालकमंत्री

गेल्या ४८ वर्षांच्या परंपरेतून निर्माण झालेली  ‘लेट्‌स आउट डू’ ही आमची विचारसरणी प्रतिध्वनित करणाऱ्या ‘पुणे हाफ मॅरेथॉन’सोबत जोडले जाण्याबाबत आम्हाला आनंद आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे ‘गेरा डेव्हलपमेंट्‌स’ही भूतकाळापेक्षा अधिक समृद्ध भविष्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे यावर विश्वास ठेवते. या स्पर्धेतील सहभागींना स्पर्धकांना ‘लेट्‌स आउट डू’ असेच आमचे प्रोत्साहन असेल.
- रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्‌स

एकूण साडेएकवीस लाख रुपयांची पारितोषिके
सर्व बक्षिसे भारतीय धावपटूंना
शहरातील पाच मध्यवर्ती ठिकाणी मोफत प्रशिक्षण
या सत्रांना भरभरून प्रतिसाद
डॉ. जॅक डॅनिएल्स यांच्या संकल्पनेतील ‘रन स्मार्ट’चा अवलंब
त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’चा लौकीकही सार्थ ठरणार
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी, विविध क्षेत्रांत काम करणारे अधिकारी-कर्मचारी अशा सर्वंच पातळ्यांवरील नागरिक सहभागी
फॅमिली रनमध्ये सहकुटुंब सहपरिवार धावण्यास जोरदार प्रतिसाद
वडील-मुलगा, आई-मुलगी, पती-पत्नी असे सहभागी
नागरिक, हास्य क्‍लब, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचाही उत्स्फूर्त सहभाग
लष्कराचे अधिकारी, जवान आणि धावपटूही सहभागी
ढोल-ताशाच्या दणदणाटात प्रारंभ होणार
२१ किमी, १० किमी शर्यतींपूर्वी ‘जन-गण-मन’चे लष्कर आणि पोलिस बॅंडकडून सादरीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com