पिंटाकुमार, शीतल विजेते

पिंटाकुमार, शीतल विजेते

पुणे-  बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद) विजेतेपद मिळविले. शर्यतीच्या परतीच्या टप्प्यात त्याला आव्हान देणारा सतीश जय (३१ मिनिटे ४४ सेकंद) अवघ्या दोन सेकंदाने मागे राहिला. हेमंत कुमार यादवने ३१ मिनिटे ५५ सेकंदात अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात नागपूरच्या शीतल भगतने ३७ मिनिटे १९ सेकंदात टप्पा पार करून प्रथम, नयन किरदक हिने ३९ मिनिटे तीन सेकंद, तसेच स्वाती वानवडेने ३९ मिनिटे ५८ सेकंदात स्पर्धा पूर्ण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. 

अर्धमॅरेथॉन सुटल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेस प्रारंभ झाला. सुमारे तीन हजार ५०० धावपटू म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून बाहेर पडताच रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले जात होते. एक एक टप्पा पार करीत धावपटू बाणेर रस्ता तेथून व्हेरीटासला वळसा मारून पुन्हा स्टेडियमकडे कूच करीत होते. परतीच्या मार्गावर स्पर्धकांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत केले जात होते. चौकाचौकांमध्ये ज्येष्ठ नागरिक आवर्जून थांबून खेळाडूंचा उत्साह वाढवत होते. ‘कमॉन कमॉन यू कॅन फिनिश इट’ असे म्हणत त्यांना प्रोत्साहित करीत होते. क्रीडा संकुलात प्रवेश करताच धावपटूंमध्ये अंतिम रेषा सर्वप्रथम गाठण्यासाठी चुरस वाढली. निर्णायक क्षणी अंतिम रेषेच्या अगदी अलीकडे पिंटाने दोन सेकंदाने सतीशला मागे टाकत विजेतेपद मिळविले. मुलींच्या शर्यतीतही शीतल भगत हिने नयना किरदक हिचे आव्हान मोडून काढले. या अंतरातील पुरुष, महिला गटातील पहिल्या तीन विजेतेपदांच्या अंतरात काही सेकंदाचाच फरक राहिल्याने या शर्यतीमध्ये झालेली चुरस समजून येईल.

निकाल
२१ कि.मी. पुरुष - प्रदीप सिंग (१ तास ६ मिनिटे ८ सेकंद), मान सिंग
(१ तास ६ मिनिटे ३९ सेकंद), प्रल्हाद धनावत (१ तास ६ मिनिटे ५३ सेकंद)

महिला - मनीषा साळुंके (१ तास २२ मिनिटे २० सेकंद), सिंधू यादव (१ तास २३ मिनिटे ३ सेकंद), मोनिका राऊत (१ तास २३ मिनिटे ४५ सेकंद)

१० कि.मी. पुरुष - पिंटाकुमार (३१ मिनिटे ४२ सेकंद), सतीश जय
(३१ मिनिटे ४४ सेकंद), हेमंत कुमार यादव (३१ मिनिटे ५५ सेकंद),

महिला - शीतल भगत (३७ मिनिटे १९ सेकंद), नयन किरदक (३७ मिनिटे १९ सेकंद), स्वाती वानवडे (३९ मिनिटे ०२ सेकंद)

-------------------
१० कि.मी.
-------------------

२०१४ पासून धावण्याचा सराव करत आहे. मात्र, पुण्यात प्रथमच धावण्याचा योग आला. पहिल्यापासूनच ५ किमी मॅरेथॉनवर लक्ष केंद्रित केले होते. आता, १० किमी, क्रॉसकंट्री धावण्यास सुरवात केली आहे. सध्या अर्ध किंवा पूर्ण मॅरेथॉनऐवजी ५ आणि १० किमी शर्यतीकडेच लक्ष देणार आहे. मी माझ्या विजयाचे श्रेय रणजित कुमार पटेल, मान चौधरी, अजय कुमार यांना देतो. विजयेंद्र सिंह हे माझे प्रशिक्षक आहेत.
- पिंटाकुमार यादव (१० कि.मी. विजेता)



माझ्या गटातील स्पर्धा खडतर राहिली. माझी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ३०.२० मिनिटे इतकी राहिली. परंतु, या शर्यतीमध्ये ३१ मिनिटे वेळ नोंदविली. पहिल्यापासून धावपटूंच्या गर्दीत अडकल्याने मला वैयक्तिक कामगिरी उंचाविता आली नाही. सध्या १० किमी शर्यतच पुढे चालू ठेवणार असून, अद्याप अर्ध किंवा पूर्ण मॅरेथॉन करू शकलेलो नाही. माझ्या यशाचे श्रेय पूर्णपणे माझ्या प्रशिक्षकांना देतो.
- धमेंद्र कुमार यादव (उपविजेता)

 

रवींद्र टोंग यांच्याकडे २०११ मध्ये प्रशिक्षणाला सुरवात घेतली.  मात्र, आता प्रशिक्षकांऐवजी स्वतःच धावण्याचा सराव करत आहे. ३ हजार मीटर ‘ट्रिपल चेस’ हा माझा मुख्य केंद्रबिंदू आहे. माझी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ३६.४७ मिनिटे इतकी राहिली आहे. परंतु, या वेळेस कामगिरीत मला सुधारणा करता आली नाही. माझे पुढील ध्येय खुली राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा आहे. प्रशिक्षक रवींद्र टोंग आणि आई-वडिलांना मी विजयाचे श्रेय देते. स्पर्धेचे नियोजनही खूप छान होते. खुली राष्ट्रीय क्रॉसकंट्रीमध्ये यश मिळविणे हेच आता माझे पुढील ध्येय आहे.
- शीतल भगत (महिला विजेती)

मी मुळात कबड्डीपटू आहे. धावण्याच्या आवडीमुळे या क्रीडा प्रकाराकडे वळाले. सध्या फक्त अर्धमॅरेथॉन धावते. पहिल्यांदाच १० कि.मी. अंतर धावले. कमी दिवसांच्या सरावात मला हे यश मिळाले. वर्षभरापासून पुण्यात अरविंद चव्हाण यांच्याकडे सराव करत आहे. त्यांनाच मी यशाचे श्रेय देते. आई ललिता, वडील बाळासाहेब यांच्या पाठिंब्याचाही माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. यापूर्वी पाचगणी अर्धमॅरेथॉन केली होती. पुढील काळात मुंबई येथे अर्धमॅरेथॉनमध्ये धावण्याची इच्छा आहे.
- नयन किरदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com