पुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी यशवंत ठरले, तर कोणी गुणवंत, पदके ठरावीक गटातील पहिल्या तिघांनाच मिळाली; पण तंदुरुस्तीसाठी सक्रिय होण्याचा संदेश आणि तो कृतीत उतरविण्याची इच्छाशक्ती घेऊनच प्रत्येकाचा संडे ठरला हेल्थ डे!

पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी यशवंत ठरले, तर कोणी गुणवंत, पदके ठरावीक गटातील पहिल्या तिघांनाच मिळाली; पण तंदुरुस्तीसाठी सक्रिय होण्याचा संदेश आणि तो कृतीत उतरविण्याची इच्छाशक्ती घेऊनच प्रत्येकाचा संडे ठरला हेल्थ डे!

‘९/१२’च्या रविवारची पहाट पुणेकरांसाठी खास ठरली. अबालवृद्धांना सामावून घेणाऱ्या या उपक्रमाचा ‘फॅमिली रन’ मानबिंदू ठरला. कुटुंब रंगलंय धावण्यात याची प्रचिती अनेकांना आली. त्यामुळे आरोग्याचा जागर घराघरांत घुमला आणि धावपटूंच्या फिनिश लाइनवरील जयघोषाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा आसमंत दणाणला. सकाळी सात वाजता फॅमिली रनला प्रारंभ झाला तेव्हा सोनेरी सूर्यकिरणांनी आकाश झळाळून निघाले अन्‌ पुणे धावले!

तीन पिढ्या एकत्र 
मॅरेथॉनमार्गावरील रस्त्यावर धावपटू कौशल्य दाखवत असताना बालेवाडीतील मैदानात फॅमिली रनची तयारी सुरू झाली होती. प्रत्यक्ष धावण्यास सुरवात करण्याअगोदर वॉर्मअपबरोबर कुटुंबाचा सेल्फी तर आवर्जून होत होता. तुफान प्रतिसाद लाभलेल्या फॅमिली रनच्या या कुटुंबांनी तर मैदान भरले होते. त्यानंतर शर्यतीचा मार्ग कमी पडत होता एवढी गर्दी झाली होती. आजोबा, वडील आणि नातू अशा तीन पिढ्या एकत्र धावण्याचा हा योग इतिहास घडवणारा होता.

पुण्याबाहेरूनही प्रतिसाद
या पुणे मॅरेथॉनची वार्ता अगोदरच पुण्याबाहेरही पसरली असल्यामुळे चाळीसगावहून प्राध्यापक खुशाल कांबळे दोन दिवसांपासून पुण्यात आले होते. स्वतः राहण्याची सोय केली आणि तेवढ्याच हिरिरीने सहभागी झाले, तर साताऱ्याहून डॉ. माईनकर पत्नीसह धावले. ‘सकाळ’मध्ये दररोज प्रसिद्ध होणाऱ्या टिप्सचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

८१ वर्षांच्या आजींचा तुफान उत्साह
धावण्याला वय नसते हे ८१ वर्षीय वासंती दांडेकर यांनी दाखवून दिले. त्या केवळ सहभागीच झाल्या नाहीत, तर १० कि.मी. शर्यत त्यांनी पूर्ण केली. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तरुणांनाही लाजवणारा होता.

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमधील सहभागी कुटुंबांतील उत्साह पाहण्यासारखा होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकही त्यात सहभागी झाले होते. असा उत्साह आणि आनंद कधीही विकत घेता येत नाही, तो अनुभवायचा असतो. तो अनुभव आज या सगळ्या सहभागी स्पर्धक आणि शर्यत बघणाऱ्यांनी घेतला. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. नागरिकांना चांगले वातावरण दिले, की ते सहभाग नोंदवतातच आणि हे सकाळ आयोजित पुणे हाफ मॅरेथॉनने स्पष्ट केले. 
- प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे अध्यक्ष

दृष्टिक्षेपात
तीन गटांत मिळून १८ हजार धावपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या उपस्थितीत अर्धमॅरेथॉनला निशाण
‘फॅमिली रन’च्या उद्‌घाटनाचे क्रिकेटपटू केदार जाधव आकर्षण
वैयक्तिक तंदुरुस्ती, तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी वचनबद्ध करणाऱ्या शपथपत्राचे गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्याकडून वाचन
व्हीलचेअर शर्यत सुरू होताना स्पर्धकांसाठी टाळ्यांचा अधिक गजर आणि शर्यत पूर्ण झाल्यावर पंजाबी गाण्यांवर ठेका
छोट्या मुलांना कोणी खांद्यावर, तर कोणी हातात घेऊन शर्यत पूर्ण केली

Web Title: Punekar run Great participation in the pune half marathon 2018