Pro Kabaddi 2019 : पलटणचे अखेर बरोबरीवरच समाधान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

प्रो-कबड्डी 
पुणे - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात घरच्या मैदानावरही पुणेरी पलटण संघाला बुधवारी आपल्या वर्चस्वाला विजयाची किनार लावता आली नाही. अखेरच्या सहा मिनिटांपर्यंत राखलेली सात गुणांची आघाडी त्यांना टिकवता आली नाही. अखेरच्या मिनिटाला त्यांना लोण स्विकारावा लागला. त्यामुळे तमिळ थलैवाजविरुद्ध वर्चस्व राखलेल्या सामन्यात त्यांना अखेर 36-36 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. 

प्रो-कबड्डी 
पुणे - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात घरच्या मैदानावरही पुणेरी पलटण संघाला बुधवारी आपल्या वर्चस्वाला विजयाची किनार लावता आली नाही. अखेरच्या सहा मिनिटांपर्यंत राखलेली सात गुणांची आघाडी त्यांना टिकवता आली नाही. अखेरच्या मिनिटाला त्यांना लोण स्विकारावा लागला. त्यामुळे तमिळ थलैवाजविरुद्ध वर्चस्व राखलेल्या सामन्यात त्यांना अखेर 36-36 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. 

म्हाळुंगे बालेवाडी येतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात पुणेरी पलटण संघ पुन्हा एकदा सामना लावून खेळण्यात अपयशी ठरले. लय राखलेल्या सामन्यात त्यांनी ती कायम ठेवण्याच्या नादात काहिसा बचावात्मक पवित्रा घेतला आणि त्याचा फटका त्यांना बसला. विश्रांतीला मिळविलेली 18-12 ही आघाडी त्यांनी 34-27, 38-38, 36-29 अशी वाढवतच नेली होती. अखेरच्या मिनिटाला मात्र 36-33 अशा तीन गुणांच्या आघाडीवर त्यांच्याकडे एकटा नितीन तोमर राहिला. त्याच्या अखेरच्या चढाईत तमिळच्या बचावपटूंनी त्याला बोनस न देता त्याची पकड केली आणि सामना बरोबरीत सोडवला. ही अखेरची पकड राहुल चौधरीने केली. 

अजय ठाकूरची अनुपलब्धता, सूर गमावून बसलेले मनजीत चिल्लर आणि राहुल चौधरी यामुळे दुबळ्या तमळि थलैवाज संघावर घाव घालण्यात पलटणच्या शिलेदारांना अपयश आले. उत्तरार्धात तमिळच्या अजितकुमारने चौफेर चढाया करून त्यांच्या बचावाला आव्हान दिले. बचावाच्या आघाडीवर पलटण वरचढ ढरले असले, तरी अजितकुमारच्या 18 गुणांनी त्यांना नक्कीच निराश केले. पुणे संघाकडून मनजीतने "सुपर टेन' केले. त्याला पंकज मोहितेसह बचावात सुरजित आणि गिरीश इरनाक यांची साथ मिळाली. पण, तरी विजयापासून ते दूरच राहिले. 

मुंबईने आव्हान राखले  
त्यापूर्वी, युपी योद्धा संघाने पुन्हा एकदा सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, या वेळी ते यु मुम्बाला रोखू शकले नाहीत. अभिषेक सिंग (11 गुण) आइण अर्जुन देसवाल (7 गुण) यांच्या चढायातील कामगिरीने मुंबईला सामन्यावर नियंत्रण राखता आले, तर सुरिंदर सिंगच्या बचावातील "हाय फाईव्ह' मुळे त्यांनी वर्चस्व राखले आणि 39-36 असा विजय मिळविला. यूपीकडून रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव, सुरेंद्र गिल यांची कामगिरी चमकदार झाली. आक्रमण आणि बचाव यांत दोन्ही संघांची ताकद समान राहिली. यूपी संघाला स्विकारावे लागलेले दोन लोण हाच या सामन्याच्या कामगिरीतील महत्वाचा फरक ठरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puneri Paltan and Tamil Thalaivas tie