पुण्याचे आक्रमण बंगालने रोखले

पुण्याचे आक्रमण बंगालने रोखले

बंगळूर - प्रो-कबड्डी स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात बंगाल संघाच्या मनू गोयतला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करताना पुणे संघाचा कर्णधार मनजित चिल्लर.

बंगळूर - दीपक हूडाला अखेरच्या चढाईत एकही गुण घेता आला नाही, त्यामुळे चढाईत वर्चस्व राखल्यानंतरही पुणेरी पलटणला बंगाल वॉरियर्सविरुद्ध प्रो कबड्डी लीग स्पर्धेत ३४-३४ बरोबरी मान्य करावी लागली. या बरोबरीमुळे पुण्याची अव्वल क्रमांकाची संधी हुकली.

कांतीरवा स्टेडियमवरील या लढतीत पुण्याचे जोरदार आक्रमण आणि बंगालचा भक्कम बचाव यांच्यातील जोरदार चुरस हेच या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. पुण्याने दोन्ही अर्धात सुरवातीस घेतलेली आघाडी बंगाल मोडून काढत होते. कोरियाचा जॅंग कुन ली पुण्याच्या आक्रमणास प्रत्युत्तर देऊ लागला, त्याच वेळी पुण्याने पकडीतही गुण घेण्यास सुरवात केली. सातत्याने आघाडी बदलणाऱ्या या सामन्यात जवळपास प्रत्येक मिनिटास चित्र बदलत होते. पुण्याचे आक्रमण, पण अखेरच्या मिनिटात यशस्वी ठरणार नाही, याची खबरदारी बंगालने घेतली. अर्थात अखेरची दोन मिनिटे असताना पुणे ३२-३४ असे मागे पडले होते; पण त्यांनी चांगला प्रतिकार करीत बरोबरी साधली, पण अखेरच्या चढायात पुण्याला एकही गुण मिळाला नाही.

नीलेश शिंदे  (५), विशाल माने (६), गिरीश इरनाक (४) आणि नितीन मदने (३) या मराठी खेळाडूंच्या जोरदार पकडी करीत पुण्याचे आक्रमण रोखले होते. जॅंग कुन ली याचे चढाईतील सहा गुणही पुण्यास रोखत होते. दीपक हूडा, अजय ठाकूर, मनजित चिल्लर आणि सोनू नरवालच्या प्रभावी आक्रमणास रवींदर पहलच्या पकडीची साथ लाभली; पण ते कमीच पडले. पुण्याने चढाईत २१-१२ असे वर्चस्व राखले, पण त्यास बंगालने पकडीतील १८-८ वर्चस्वाने प्रत्युत्तर दिले. बंगालला तीन सुपर टॅकलचाही फायदा झाला.

बंगळूरला चांगलीच वेसण
तेलुगु टायटन्सने भक्कम बचावाच्या जोरावर बंगळूर बुल्सला घरच्या मैदानावर ३२-२४ अशी वेसण घातली. फुल चार्ज माडी अर्थातच बंगळूर बुल्सने प्रतिस्पर्ध्यांना जोरदार धडक द्यावी अशीच चाहत्यांची जोरदार अपेक्षा होती.

बंगळूरचा अव्वल आक्रमक रोहित कुमारची तेलुगुचा अव्वल बचावपटू संदीप नरवालने छान पकडी करीत यजमानांच्या आक्रमणातील हवाच काढून घातली. रोहितला १६ चढाईत ९ गुणच मिळवता आले; पण त्याच्या झालेल्या ६ पकडी बंगळूरला जास्त सलत होत्या.  तेलुगुचा कर्णधार राहुल चौधरीचे आक्रमण बंगळूरची डोकेदुखी ठरली, त्याहीपेक्षा संदीप नरवालच्या मार्गदर्शनाखालील पकडी बंगळूरची डोकेदुखी ठरल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com