पी. व्ही. सिंधूला विजेतेपद; मरिनचा पराभव

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

जागतिक क्रमवारीत दुसरी 
सिंधूने भारतीय बॅडमिंटनची शान उंचावताना रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर मायदेशात प्रथमच विजेतेपद जिंकले. या यशामुळे तिने जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळविला; तसेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानापासून काही गुणच दूर आहे.

नवी दिल्ली - भारतीय बॅडमिंटनची सम्राज्ञी पी. व्ही. सिंधूने दिल्ली जिंकली आहे. शरीरवेधी स्मॅशचा धडाका करीत सिंधूने ऑलिंपिकविजेत्या कॅरोलिन मरिनला तिच्या क्षमतेचा पूर्ण कस बघण्यास भाग पाडले, पण अखेर ऑलिंपिक विजेती मरिन हिला सलग दुसऱ्यांदा सिंधूसमोर शरणागती पत्करावी लागली. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने ऑलिंपिक विजेतीचा प्रतिकार 21-19, 21-16 असा सहज मोडून काढला. 

सिंधूने पाऊणतास चाललेली ही लढत जिंकल्यावर गोपीचंद यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य मरिनला रोखण्याची योजना यशस्वी ठरली हेच दाखवणारे होते. सिंधूने लढत संपल्यावर प्रथम गोपीचंद यांच्याकडे जाऊन जणू त्यांचे आभार मानले आणि त्यानंतरच मरिनशी हस्तांदोलन केले. रिओ ऑलिंपिकच्या अंतिम लढतीत तीन गेममध्ये हार पत्करल्यानंतर सिंधूने मरिनला दुबईत दोन गेममध्ये हरवले होते; पण त्या वेळी मोसम संपत आहे. मरिन थकलेली आहे, असे सांगून सिंधूच्या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या वेळी सिंधूने पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या मरिनला तिचा खेळ करण्याची संधीच दिली नाही. 

रिओ तसेच त्यापूर्वीच्या लढतीत मरिनने नेटजवळ जास्त चकमकी करण्यास सिंधूला भाग पाडले होते, पण सिंधूने आज सुरवातीपासून जम्प स्मॅश आणि ड्रॉप्सचा धडाका सुरुच केला. मरिनला हलकेच रॅली करुन आपल्याला नेटजवळ खेचण्याची संधीच मिळणार नाही, ही खबरदारी सिंधू घेत होती. सिंधूच्या सुरवातीच्या क्रॉस कोर्ट स्मॅशना मरिनकडे उत्तर नव्हते. अर्थात मरिनचा प्रतिकार सुरुच होता. तिने प्रसंगी स्मॅशला स्मॅशने उत्तर देत होती, तिने सिंधूची 6-1 आघाडी 11-9 अशी कमी केली. एवढेच नव्हे तर 19-18 अशी आघाडी घेतली; पण सिंधूने सलग तीन गुण घेत पहिला गेम जिंकला. 
रिओतही सिंधूने पहिला गेम 21-19 जिंकला होता, पण त्यानंतर लढत कशी संपवायची, आघाडीचा कसा उपयोग करायचा हे शिकलो आहोत, हेच आता सिंधू दाखवत होती. दुसऱ्या गेममध्ये सिंधूची सुरुवात जबरदस्त होती. तिला आता मरिन काय करणार याची जणू पुरेपूर कल्पना आली होती व तेच निर्णायक ठरत होते. सिंधूने दुसऱ्या गेमच्या सुरुवातीस आघाडी घेतल्यावर प्रेक्षक बेभान झाले होते. त्याचे दडपण न घेता तिने खेळावर लक्ष केंद्रित केले होते. दुसऱ्या गेममधील ब्रेकनंतर मरिन नेट रॅलीजच्या जोरावर प्रतिकार करू लागली; पण तो फार वेळ टिकला नाही. सिंधूची आघाडी कायम राहिली आणि तिच्या ताकदवान स्मॅशेस निकाल स्पष्ट करीत गेल्या. 

सिंधूचा प्रतिकार 
- सिंधू आणि मरिन यांच्यातील ही नववी लढत, यापूर्वीच्या आठ सामन्यांत मरिनचे 5-3 वर्चस्व 
- यापूर्वीच्या लढतीत सिंधूचा दोन गेममध्येच विजय 
- दोघींतील भारतातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील लढत मरिनने जिंकली होती, 2015च्या सय्यद मोदी स्पर्धेत मरिनने दोन गेममध्येच बाजी मारली होती 
- दोघींत 2011 च्या मालदीव चॅलेंजमध्ये प्रथम लढत, त्यात सिंधूची सरशी होती. सिंधूला त्यानंतरच्या मरिनविरुद्धच्या विजयासाठी 2015च्या ऑक्‍टोबरपर्यंत (डेन्मार्क ओपन) प्रतीक्षा करावी लागली होती.

चाहत्यांसमोर जिंकले याचा जास्त आनंद - सिंधू 
सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या भारतीय पाठीराख्यांसमोर विजेतेपद जिंकले याचा आनंद जास्त आहे, असे इंडिया ओपन सुपर सीरिज विजेतेपद जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूने सांगितले. 

विजेत्या सिंधूचा आनंद जणू गगनात मावत नव्हता. ती म्हणाली, ""अंतिम लढत खूपच चांगली झाली. मरिन खूपच छान खेळली. पहिल्या गेममध्ये काहीही घडू शकले असते. ही खूपच महत्त्वाची स्पर्धा होती. नव्या वर्षाच्या सुरुवातीस जिंकले, त्याचा आगामी महिन्यात नक्कीच फायदा होईल. चाहत्यांनी मला सतत प्रोत्साहित केले. मार्गदर्शकांचा सल्लाही मोलाचा ठरला. 

सिंधूचे ऑलिंपिक रौप्यपदकानंतरचे हे दुसरे सुपर सीरिज विजेतेपद आहे. तिने गतवर्षी चायना ओपन जिंकली होती. रिओ ऑलिंपिक अंतिम लढतीच्या वेळी दोन रॅलीजमध्ये जरा जास्तच वेळ घेतल्याची टीका मरिनवर झाली होती. सिंधूने नेमके आज हेच केले. त्यामुळे मरिन नाराज झाली होती; पण तिने सिंधूला लक्ष्य करणे टाळले. पंचांनीच याकडे लक्ष द्यायला हवे. दोन वर्षांपूर्वी मला रेडकार्ड दाखवण्यात आले होते, अशी खंत मरिनने व्यक्त केली. मरिनने आपला खेळ उंचावला नसल्याची कबुली दिली. ती म्हणाली, प्रत्येक खेळाडूत सुधारणा होत असते; पण ऑलिंपिकनंतर माझा खेळ खालावला आहे. 

ऑलिंपिकच सर्वोत्तम 
मरिनने या वेळी आपली सर्वोत्तम कामगिरी ऑलिंपिकमध्ये झाल्याचेही मान्य केले. ती म्हणाली, "ऑलिंपिक सुवर्णपदक माझ्यासाठी सर्व काही होते. रिओमध्ये मी सर्वोत्तम कामगिरी केली. पण, त्यानंतर दुखापतींमुळे माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. अर्थात, भारतात खेळण्याचा अनुभव वेगळाच होता. येथे खेळण्यामुळे वेगळाच आत्मविश्‍वास आणि प्रेरणा मिळाली.'' कोर्टवरील आम्ही प्रतिस्पर्धी असलो, तरी बाहेर चांगल्या मैत्रिणी आहोत, असेही मरिनने सांगितले. 

जागतिक क्रमवारीत दुसरी 
सिंधूने भारतीय बॅडमिंटनची शान उंचावताना रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर मायदेशात प्रथमच विजेतेपद जिंकले. या यशामुळे तिने जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळविला; तसेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानापासून काही गुणच दूर आहे.

Web Title: PV Sindhu avenges Rio Olympic loss, beats Carolina Marin to win maiden India Open Super Series title