सिंधूसह श्रीकांतची वाटचाल खंडित

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांची मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल उपांत्य फेरीत खंडित झाली. याबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 
 

क्वालालंपूर - भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांची मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील वाटचाल उपांत्य फेरीत खंडित झाली. याबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलिना मरिनला हरवून आशा उंचावलेल्या सिंधूचा गतविजेत्या तई त्झू यिंग हिच्याकडून पराभव झाला. गतविजेत्या तैवानच्या तईने तांत्रिक कौशल्य व तंदुरुस्तीच्या जोरावर 55 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-15, 19-21, 21-11 अशी बाजी मारली. तईविरुद्ध सिंधूला 12 लढतींमध्ये सलग पाचवा व एकूण नववा पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी तईने तिन्ही सामने जिंकले होते. तईने कोर्टवर वेगवान हालचाली केल्या. आक्रमण ते बचाव असा बदल तिने सफाईदारपणे केला. तिने चौथ्यांदा या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. 

श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटा याने 21-13, 21-13 असे हरविले. हा सामना 42 मिनिटे चालला. श्रीकांतला नऊ लढतींत सहाव्यांदा मोमोटाने हरविले. मोमोटा जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर आहे. अवैध सट्टेबाजी केल्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुनरागमन केल्यावर तो सनसनाटी फॉर्मात आहे. त्याचा हा सलग 21वा विजय आहे. मोमोटाने वैविध्याच्या जोरावर श्रीकांतला संधी दिली नाही. त्याच्या स्मॅशमध्ये ताकद आणि अचूकता होती. 3-3 व 5-5 अशा बरोबरीनंतर श्रीकांत 7-10 असा मागे पडला. मोमोटाने 13-8, 17-12 अशा आघाडीसह पकड भक्कम केली. दुसऱ्या गेममध्ये मोमोटाने सुरवातीलाच 5-1 अशी आघाडी घेतली. मग तो 11-5 असा पुढे होता. श्रीकांतसाठी रॅलींचा शेवट चुकीच्या फटक्‍यांमुळे कटू ठरला. 

Web Title: PV Sindhu, Kidambi Srikanth crash out after losing in semifinals