ऑलिंपिक पदकानंतर नव्याने सुरवात : सिंधू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई : ऑलिंपिकमधील पदक हे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीचे अंतिम ध्येय असते; पण लहान वयातच हे साध्य केलेल्या सिंधूने आता या यशाच्या पायावर पुढील पावले टाकणार असल्याचे सांगितले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान हे लक्ष्य आहेच; पण त्याचबरोबर महिला एकेरीतील आव्हान खडतर झाल्यामुळे स्पर्धाही कठीण झाल्याचे नमूद केले. 

मुंबई : ऑलिंपिकमधील पदक हे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीचे अंतिम ध्येय असते; पण लहान वयातच हे साध्य केलेल्या सिंधूने आता या यशाच्या पायावर पुढील पावले टाकणार असल्याचे सांगितले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान हे लक्ष्य आहेच; पण त्याचबरोबर महिला एकेरीतील आव्हान खडतर झाल्यामुळे स्पर्धाही कठीण झाल्याचे नमूद केले. 

आयडीबीआय फेडरल इन्शुरन्सने दिग्गज मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांच्या साथीत क्वेस्ट फॉर एक्‍सलन्स कार्यक्रम सुरू केला आहे. ऑलिंपिक पदकाचे लक्ष्य बाळगलेल्या या कार्यक्रमात ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, पारुपली कश्‍यप, ऑलिंपियन श्रीकांत यांचाही सहभाग होता. कार्यक्रमाचे आकर्षण अर्थातच सिंधू होती. 

ऑलिंपिक पदकानंतर अपेक्षा तसेच जबाबदारी वाढली आहे; पण त्या यशापासून नव्याने सुरवात करण्याचे तिने ठरवले आहे. खडतर सराव महत्त्वाचाच असतो. ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर सर्वच बाबतीत नव्याने विचार केला. आता आपल्याला इथून पुढे जायचे हे निश्‍चित केले. प्रत्येक वेळा सर्वोत्तम कामगिरी होत नाही. पदकामुळे आत्मविश्‍वास उंचावला असला, तरी त्यानंतर खूप काही बदलले आहे. माझ्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत, जबाबदारी वाढली आहे. हा जो काही पल्ला गाठला आहे, जिथे पोहोचले आहे, तिथे राहणे अवघड आहे, मात्र याचे कोणतेही दडपण घेत नाही. खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे असते. अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी सर्वोत्तम खेळ करण्याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते, असे तिने सांगितले. 

प्रत्येक खेळाडूसाठी तसेच प्रत्येक गुणानुसार खेळात बदल करावा लागतो. विचार प्रक्रियाही महत्त्वाची ठरते. प्रत्यक्ष लढतीत काय घडत आहे, मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन कायम खेळत असते, असे सांगणाऱ्या सिंधूने जागतिक अव्वल क्रमांकाचे नक्कीच लक्ष्य आहे. पण थेट उडी मारण्याचे लक्ष्य न ठेवता प्रत्येक पायरी चढत जाणार आहे. 
स्पर्धा खूपच वाढली आहे. केवळ काही नव्हे तर वीस खेळाडूत चुरस तीव्र आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरत आहे. केवळ चीनमधीलच नव्हे तर अन्य देशातील स्पर्धकही खडतर असतात. महिला स्पर्धा जास्त खडतर झाली आहे. त्यासाठी सराव कायम महत्त्वाचा असतो. ऑलिंपिकनंतर व्यूहरचनाही बदलावी लागली. हे यश प्रोत्साहन देत राहते, असेही तिने सांगितले. 

भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा खूपशा शहरात आहेत. खेळाबाबतचा रस वाढत आहे. मार्गदर्शनाचा दर्जाही उंचावत आहे. खेळाडूंची संख्या वाढल्यावर वाढत्या स्पर्धेमुळे दर्जाही उंचावतो. माझे लक्ष्य भारतीयांनी सातत्याने सुपर सीरिज स्पर्धेत पदक जिंकावे, तसेच ऑलिंपिक जागतिक स्पर्धात यश मिळवावे हेच आहे. 
- पुल्लेला गोपीचंद

Web Title: PV Sindhu targets for Number One position in badminton rankings