इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती 

इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती 

मुंबई : सलामीच्या दोन सामन्यांत तीन गेमच्या खडतर लढतीस सामोरे जावे लागलेल्या पी. व्ही. सिंधूने पारंपरिक प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहारा हिला दोन गेमच्या एकतर्फी लढतीत पराजित करून सुखद धक्का दिला. सिंधूने माजी जगज्जेतीस पराजित करीत इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. 

पाचव्या मानांकित सिंधूने जाकार्ता येथील स्पर्धेतील विजयाद्वारे ओकुहाराविरुद्धच्या लढतीत 8-7 असे वर्चस्व मिळवले. ही कामगिरी तिने कमालीच्या जोषात केली. सिंधूला दीर्घ रॅली करून दमवण्याची आणि अचानक ड्रॉप्स किंवा स्मॅश करण्याची ओकुहाराची योजना होती, पण सिंधूने धडाकेबाज आक्रमक खेळ केला. तिची रॅली झटपट संपवण्याची योजना प्रत्येक गुणागणिक जास्त प्रभावी होत गेली आणि तिने 44 मिनिटांत 21-14, 21-7 असा विजय संपादला. आता तिची लढत द्वितीय मानांकित चेन युफेई हिच्याविरुद्ध (चीन) होईल. 

सिंधू-ओकुहारा लढत म्हटल्यावर त्यांच्यातील जागतिक स्पर्धेतील अंतिम लढतीची, त्यातील दीर्घ रॅलीचीच आठवण होते. यावेळच्या सामन्याची सुरुवातही याच पद्धतीने झाली. या दोघींतील सामन्यातील आठव्या गुणासाठी जवळपास 40 शॉटस्‌ची रॅली झाली, त्यावेळी सिंधूच्या चुकीचा ओकुहारास फायदा झाला होता. सुरुवातीस ओकुहाराची दीर्घ रॅली जिंकण्याची चाल यशस्वी ठरली, पण काही वेळातच सिंधूने नेटजवळ जात स्मॅश आणि ड्रॉप्सचा धडाका सुरू केला. त्यामुळे ओकुहाराला टॉस-ड्रॉप पद्धतीने खेळणे अवघड झाले. 

पहिल्या गेमच्या सुरुवातीस सिंधूची आघाडी 10-8 मर्यादित होती, पण ब्रेकनंतर सिंधूने सलग पाच गुण घेतले. ओकुहाराला टॉस केलेल्या शटलवर नियंत्रण राखणे अवघड जात होते. त्याचबरोबर सिंधूला बॅकहॅंडच्या जाळ्यातही ओकुहाराला पकडता आले नाही. 

दुसऱ्या गेममध्ये पहिल्या गेमच्या उत्तरार्धाचीच पुनरावृत्ती घडली. सिंधूने 6-1 आघाडी घेतल्यावर ओकुहारा प्रतिकार करणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली. तिने ओकुहाराला नेटपासून दूर ठेवले. त्याचवेळी नेटजवळ वेगाने धावत खोलवर ड्रॉप्स केले. ओकुहाराचा मनगटाला झटका देत शटलची दिशा बदलण्याचा प्रयत्नही फारसा यशस्वी झाला नाही. सिंधूने 11-6 या ब्रेकनंतर सलग दहा गुण घेतले, पण त्याचवेळी चाहत्यांना लढतीचा निर्णय स्पष्ट झाला होता. 

आज सिंधू वि. चेन 
- जागतिक क्रमवारीत सिंधू पाचवी, तर चेन तिसरी 
- या स्पर्धेत सिंधूला पाचवे, तर चेनला दुसरे मानांकन 
- प्रतिस्पर्धीतील सात लढतीत सिंधूचे 4-3 वर्चस्व 
- दोघींतील यापूर्वीची लढत गतवर्षी चायना ओपनमध्ये. त्यात चेनची तीन गेममध्ये सरशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com