INDvsSA : भारताच्या फिरकीसमोर डोकं चालत नाही;डिकॉक टरकला 

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या भारत दौऱ्यात फिरकीच्या आव्हानापुढे आपल्या संघाने शरणागती स्वीकारू नये यासाठी अशी इच्छा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विन्टॉन डिकॉक बाळगून आहे, पण दुसऱ्या बाजुला आपल्यासाठी सर्वात वाईट निकाल लागू शकतो याचीही भीती तो बाळगून आहे. 

प्रिटोरिया : येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या भारत दौऱ्यात फिरकीच्या आव्हानापुढे आपल्या संघाने शरणागती स्वीकारू नये यासाठी अशी इच्छा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विन्टॉन डिकॉक बाळगून आहे, पण दुसऱ्या बाजुला आपल्यासाठी सर्वात वाईट निकाल लागू शकतो याचीही भीती तो बाळगून आहे. 

येत्या काही दिवसांत डिकॉकच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येत आहे. धर्मशाला येथे पहिला ट्‌वेन्टी-20 सामना 15 सप्टेंबर रोजी होत आहे. त्यानंतर 2 ऑक्‍टोबरपासून विशाखापठ्ठणम येथून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. 

भारत दौऱ्यात समोर कोणती आव्हाने येणार आहेत याचा अंदाज बांधू शकत नाही. आयपीएलसाठी चांगल्या खेळपट्या तयार करण्यात आल्या होत्या त्यामुळे आमच्यासाठी फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्या तयार केल्या जातील असे वाटत नाही, तरिही दारुण अपयशाचा सामना करायला लागू शकतो याची मनाची तयारी केली आहे, असे स्पष्ट मत डिकॉकने व्यत्त केले. 

कसोटी मालिकेसाठी मात्र चित्र वेगळे असू शकते, पहिल्या दिवसापासून चेंडू फिरक घेऊ शकतो. फिरकीचा सामना करणे ही मानसिक लढाई आहे. चेंडू वळणार की सरळ रहाणार असा विचार करत फलंदाजी केली तर ती अडचणीची ठरू शकेल, असे डिकॉक म्हणाला. 

चार वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता कसोटी मालिका त्यांनी 0-3 अशी गमावली होती त्यावेळी तयार करण्यात आलेल्या खेळपट्यांवर जोरदार टीका झाली होती. मोहाली आणि नागपूर येथे सामने पाच दिवसही चालले नाही. दक्षिण आफ्रिका फलंदाजांनी भारतीय फिरकी माऱ्यासमोर शरणागती स्वीकारली होती. नागपूरची खेळपट्टी तर आयसीसीने निकृष्ठ ठरवली होती. 

या वेळी अशा खेळपट्या नसतील अशी आशा आम्ही करत आहोत. परंतु आम्हाला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मानसिक तयारी करायला लागणार आहे. डोळे उघडे ठेऊन आम्हाला खेळायला लागेल, असे डिकॉकने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quinton de Cock hopes that south africa team plays well against India