चाकूहल्ल्यातून सावरलेली टेनिसपटू क्विटोवाचे ‘कमबॅक’

पीटीआय
बुधवार, 24 मे 2017

लंडन - चेक प्रजासत्ताकाची टेनिसपटू पेट्रा क्विटोवा चाकूहल्ल्यानंतर भक्कम मनोधैर्याच्या जोरावर अपेक्षेपेक्षा लवकर सावरली आहे. आगामी फ्रेंच ओपनमध्ये पुनरागमन करायचा तिचा प्रयत्न राहील. विंबल्डन स्पर्धेत मात्र ती नक्की खेळेल. विंबल्डनमध्ये तिने दोन वेळा विजेतेपद मिळविले आहे.

लंडन - चेक प्रजासत्ताकाची टेनिसपटू पेट्रा क्विटोवा चाकूहल्ल्यानंतर भक्कम मनोधैर्याच्या जोरावर अपेक्षेपेक्षा लवकर सावरली आहे. आगामी फ्रेंच ओपनमध्ये पुनरागमन करायचा तिचा प्रयत्न राहील. विंबल्डन स्पर्धेत मात्र ती नक्की खेळेल. विंबल्डनमध्ये तिने दोन वेळा विजेतेपद मिळविले आहे.

चेक प्रजासत्ताकामधील प्रोस्टेजोवमधील घरी २० डिसेंबर रोजी तिच्यावर चाकूहल्ला झाला. कामगार असल्याचा बहाणा करून हल्लेखोर घरात घुसला. त्याने क्विटोवाच्या घशापाशी चाकू लावला होता. त्याला प्रतिकार करताना क्विटोवाच्या डाव्या हाताला जखम झाली. ती डावखुरी आहे. तिला हातावर शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. ही शस्त्रक्रिया चार तास चालली होती.

क्विटोवाच्या प्रसिद्धी व्यवस्थापक केटी स्पेलमन यांनी सांगितले की, ‘विंबल्डनच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. फ्रेंच ओपनसाठी ती अखेरच्या क्षणी निर्णय घेईल. फ्रेंच ओपनची अधिकृत प्रवेशिका यादी गुरुवारी जाहीर होईल. त्यात क्विटोवाचे नाव असेल.’ विंबल्डनच्या संयोजकांनी क्विटोवाच्या पुनरागमनाचे स्वागत केले. ऑल इंग्लंड क्‍लबतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले. तिला तयारीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. 

क्विटोवा २७ वर्षांची आहे. चाकूहल्ल्यातून सावरताना तिने भक्कम मनोधैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन प्रदर्शित केला. त्यामुळे डॉक्‍टर, फिजिओथेरपिस्ट प्रभावित झाले. या महिन्याच्या प्रारंभी तिने माँटे कार्लोमध्ये सराव करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले होते. क्‍ले कोर्टवरील स्पर्धा शारीरिकदृष्ट्या खडतर असतात. अशावेळी क्विटोवा खेळल्यास तिचा निर्णय आश्‍चर्यकारक ठरेल.

क्विटोवाने २०११ मध्ये विंबल्डन जिंकून कारकिर्दीतील पहिलेवहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले. तेव्हा तिने अंतिम सामन्यात मारिया शारापोवाला हरविले होते. त्यानंतर २०१४ मध्ये तिने विंबल्डन दुसऱ्यांदा जिंकले. तेव्हा तिने युजेनी बुशार्डला हरविले होते. सेरेना विल्यम्स ‘मॅटर्निटी लिव्ह’वर असल्यामुळे क्विटोवाचे पुनरागमन महिला टेनिससाठी सुवार्ताठरेल.

Web Title: Quitov's Comeback